एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

दत्ता म्हसकर
Saturday, 11 July 2020

लग्नसोहळ्यासाठी आलेला पाव्हणा, कार्यमालक, वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा-नवरी कोरोनाबाधित निघाल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.

जुन्नर (पुणे)  : जुन्नर तालुक्यातील नुकत्याच लग्न झालेल्या नवरा- नवरीला कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शारीरिक अंतर पाळत संस्थात्मक क्वारंटाइन होण्याची पाळी आली आहे.

जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यातील नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे काल रात्री उशिरा आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 
येथील लग्नसोहळ्यासाठी आलेला पाव्हणा, कार्यमालक, वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा-नवरी कोरोनाबाधित निघाल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.  संपर्कातील अनेकांनी स्वतःहून आपली स्वॅब टेस्ट करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोहळ्यात सहभागी झालेल्याच्या संपर्कातील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेत जुन्नर तालुक्यातील लग्नसोहळ्यासाठी २० लोकांची मर्यादा घातली आहे. यामुळे जिल्ह्यातील लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी असताना जुन्नरला मात्र वीस जणांमध्ये विवाह सोहळा उरकावा लागत आहे.  

अमोल कोल्हे सांगतात, कोरोनाच्या लढाईत...माझी ढाल, माझा मास्क...

जुन्नर तालुक्यात कोरोनाचे १३७ रुग्ण झाले असून, सर्वाधिक १४ रुग्ण हे धालेवाडी येथील आहेत. काल धालेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे बुद्रुक, धनगरवाडी, जुन्नर, ओतूर, पिंपळगाव- आर्वी, तेजेवाडी, वारुळवाडी, चौदा नंबर येथे एकूण १९ संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण १३७ पैकी ६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर औरंगपूर, मोकासबाग व पिंपळगाव-आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर येथील संशयित कोरोनाबाधित रुग्ण लेण्याद्री येथील कोविड केंद्रातून ससूनला जात असल्याचे सांगून निघाला, मात्र ससूनला न जाता तो आपल्या मूळ गावी जाऊन बसला. याचा अहवाल  देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पोलिस व नगर पालिका प्रशासनाने नियमांची अमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे.

Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of the bride and groom at the wedding ceremony at Junnar positive