पुण्यात अर्ध्या तासात कोरोना चाचणी; महापालिकेकडे एक लाख किट उपलब्ध 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

पुण्यात पहिल्यांदाच रॅपिड टेस्ट होणार असून, त्यासाठी"आरसीएमआर'ची मान्यता असलेल्या कंपनीकडून 1लाख किट खरेदी करण्यात आले आहेत.ते महापालिकेच्या ताब्यात आले असून,एका किटसाठी 450 रुपये देण्यात आले आहेत.

पुणे - पुण्यात गर्भवतींसह हृदयरोग, मूत्रपिंड आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यासाठी या घटकांची "रॅपिड टेस्ट' होणार असून, त्यानंतर रुग्णांवर नेमके उपचार करणे शक्‍य होईल. त्यासाठी महापालिकेकडे एक लाख किट उपलब्ध झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या किटद्वारे तपासणी करण्यात येईल. परिणामी, कमी वेळेत कोरोना रुग्णांना शोधून त्यांच्यावरील उपचारामुळे मृत्युदर कमी होण्याची आशा महापालिकेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या "लॅब'मधील टेक्‍निशियनच्या माध्यमातून ही तपासणी होणार असून, त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. महापालिकेचे "स्वॅब कलेक्‍शन सेंटर', कोविड केअर सेंटर (सीसीसी) आणि महापालिकेच्या रुग्णांमधील प्रसूतिगृहांत अशा प्रकारची तपासणी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

सध्या "स्वॅब' घेण्याचे प्रमाण वाढल्याने जवळपास 24 ते 30 तासांनंतर अहवाल उपलब्ध होतो. तोपर्यंत संबंधित व्यक्तीवर उपचार केले जात नसल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसून आले; तर कोरोनाची तपासणी केल्याशिवाय गर्भवतींना प्रसूतिगृहात दाखलही करून घेतले जात नाही. त्याचसोबत हृदयरोग, मूत्रपिंड आणि अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांवरील उपचारालाही विलंब होत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. त्यावरून नातेवाईक आणि हॉस्पिटल व्यवस्थापनात वादाच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कमीत-कमी वेळेत कोरोनाचे निदान व्हावे, यासाठी रॅपिड टेस्टचा अवलंब केला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

एका किटसाठी साडेचारशे रुपये 
पुण्यात पहिल्यांदाच रॅपिड टेस्ट होणार असून, त्यासाठी "आरसीएमआर'ची मान्यता असलेल्या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्यात आले आहेत. ते महापालिकेच्या ताब्यात आले असून, एका किटसाठी साडेचारशे रुपये देण्यात आले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे किट घेण्यात आले आहेत. त्याच्या वापराचा परिणाम आणि उपयुक्तता लक्षात घेऊन, भविष्यात आणखी किट घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 
 
कोरोनासह अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबू नयेत, याचसाठी ही तपासणी केली जाणार आहे. प्रामुख्याने गर्भवतींना प्रसूतिदरम्यान अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी ही तपासणी उपयुक्त ठरणार आहे. तपासणीचा अहवाल वेळेत आल्यानंतर पुढच्या उपचाराची प्रक्रिया करणे सोपे होणार आहे. 
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

"आयसीएमआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. अर्ध्या तासात अहवाल मिळाल्यानंतर रुग्णांवरील उपचाराची दिशा ठरविणे शक्‍य होईल. रुग्णांच्या संपर्कातील म्हणजे एकाच कुटुंबातील (हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट) लोकांचीही प्राधान्याने तपासणी केली जाईल. 
- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test in half an hour in Pune; One lakh kits available with PMC

टॅग्स
टॉपिकस