esakal | पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात लसीकरणाचा श्रीगणेशा

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात लसीकरणाचा श्रीगणेशा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी विद्यापीठाने महापालिका प्रशासनाकडे केली होती. महापालिकेने या लसीकरण केंद्राला मान्यता दिली असून विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात गुरूवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरवात झाली.

या आरोग्य केंद्रात सध्या ‘कोविशिल्ड’ लसीचे शंभर डोस उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या वित्त विभागातील कर्मचारी प्रफुल्ल खेडकर यांना लसीचा पहिला डोस देऊन लसीकरणाला सुरवात झाली. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. दुधगावकर म्हणाले, ‘आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळेच विद्यापीठात केंद्र सुरू करावे, अशी मागणी विद्यापीठाने केली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली.’’

‘आरोग्य केंद्रातील लसीकरणाच्या नोंदणीला दोन दिवसांपूर्वी सुरवात झाली आहे. सुरुवातीला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाच लस देणार आहोत. सरकारी नियमानुसार लस देण्यात येईल, असे डॉ. उमराणी यांनी सांगितले.

विद्यापीठातील दिव्यांग, परीक्षा विभाग कर्मचारी, सफाई कर्मचारी, वाहन चालक, सुरक्षा कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सेवकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. लसीचा साठा उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे.