ऑक्सफर्डच्या लशीची भारतातही सुरू होणार चाचणी; पण कधी?

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 23 July 2020

कोरोना विषाणूंना प्रतिबंधक ठरणाऱ्या लशीची मानवी चाचणी पुढील महिन्यापासून भारतातील नागरिकांमध्ये सुरू होणार आहे.देशाच्या वेगवेगळ्या भागातील एक हजार500लोकांना ही लस देण्यात येईल

पुणे -  कोरोना विषाणूंना प्रतिबंधक ठरणाऱ्या लशीची मानवी चाचणी पुढील महिन्यापासून भारतातील नागरिकांमध्ये सुरू होणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील एक हजार 500 लोकांना ही लस देण्यात येईल. या मानवी चाचण्यांच्या निष्कर्षानंतर सुरक्षित आणि परिणामकारक असलेली लस लोकांसाठी उपलब्ध होईल. 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी, ऍस्टॅजेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना विषाणूंचा प्रतिबंध करणारी लस विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेत या लशीच्या मानवी चाचण्याही झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी "सकाळ' ला ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ""ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस निश्‍चित उपयुक्त आहे. त्यातून अँटिबॉडीज तयार होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करता येईल, अशी शक्‍यता या लशीमुळे निर्माण झाली आहे."" 

डॉ. ढेरे म्हणाले, ""प्रत्येक देशातील लोकांची प्रतिकार शक्ती, ती लस स्वीकारण्याची त्यांची शारीरिक क्षमता हे वेगळे असण्याची शक्‍यता असते. ती वेगळी असेलच असं नाही. पण, त्यामुळे गृहीत धरून ही लस भारतीय बाजारपेठेत आणली जाणार नाही. त्यासाठी भारतात नव्याने मानवी चाचण्या करत आहोत. त्या मानवी चाचण्यांची सुरवात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल. "" 

का करणार भारतातही चाचणी 
भारतातसुद्धा मानवी चाचण्या करण्यात येणार आहेत. या लशीमुळे भारतीय नागरिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत आहे की नाही, याची तपासणी यातून करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतासारख्या देशात कोरोना विषाणूंचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी लशीचे कोट्यवधी डोस लागणार आहेत. त्याचे उत्पादन हा या नंतरचा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा असेल, असेही त्यांनी सांगितले. 

लस निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान, लशीचे उत्पादन करण्यात येत आहे. तेसुद्धा आता खूप मोठ्या टप्प्यावर येऊन पोचले आहे. भारतासारख्या देशात कोट्यवधी लस लागणार. भारतामधील मानवी चाचण्या आणि ऑक्‍सफर्टमधील चाचण्यांचे निष्कर्ष साधारणतः नोव्हेंबरपर्यंत येतील. त्याच वेळी लशीच्या उत्पादनाचा वेगही वाढलेला असेल. त्यामुळे डिसेंबरच्या दरम्यान केंद्र सरकारकडून लशीबाबतचा परवाना मिळण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी मोठ्या प्रमाणात लस आपल्याकडे उपलब्ध असले. या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत, असेही डॉ. ढेरे यांनी स्पष्ट केले. 

जगाचे डोळे आता उघडले 
जगात अशा विषाणूंचा भयंकर उद्रेक होऊ शकतो, याचा धडा कोरोना विषाणूंच्या फैलावातून जगाला मिळाला. त्यासाठी सामाजिक, रोजगार, स्थलांतर आर्थिक, वैद्यकीय, औषधे, लस या गोष्टींची आवश्‍यकता असते, हे यातून अधोरेखित झाले. अशा प्रकारच्या उद्रेकाकडे फक्त रोग इतक्‍या मर्यादित दृष्टिकोनातून न पहाता साकल्याने बघण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine will be given to one and a half thousand people in the country