विलगीकरण कक्षातील सहा जणांचे नमुने निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

‘कोरोना’चा प्रादुर्भाव भारतात होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. केंद्र सरकारने स्क्रीनिंग करावयाच्या विमानतळांमध्ये वाढ केली आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मुंबई, पुणे आणि नांदेड येथे विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या दहा प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविले होते. यापैकी सहा प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने ‘निगेटिव्ह’ आले असून, उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान येत्या बुधवारपर्यंत मिळणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोरोना’चा प्रादुर्भाव भारतात होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. केंद्र सरकारने स्क्रीनिंग करावयाच्या विमानतळांमध्ये वाढ केली आहे. नवीन निर्देशानुसार ‘कोरोना’बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग मुंबईसह देशातील २० विमानतळांवर सुरू केले आहे. मुंबई विमानतळावर मंगळवारपर्यंत चार हजार ५६९ प्रवाशांचे स्क्रीनिंग केले आहे.  

विमानतळावरील स्क्रीनिंग आणि क्षेत्रीय पातळीवरील सर्वेक्षणात ‘कोरोना’बाधित भागातून आलेले २३ प्रवासी महाराष्ट्रातील आढळले आहेत. त्यापैकी दहा जणांना सौम्य सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात भरती केले आहे. यातील मुंबईत सहा, पुण्यात तीन; तर एक जण नांदेड येथे भरती आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने ‘एनआयव्ही’त पाठविले होते.

माहिती संकेतस्थळावर
नागरी विमान वाहतूक विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य या सर्व विभागांचा नियमित समन्वय साधून या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या www.mohfw.gov.in या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus Screening of passengers at the international airport