शिरूरमध्ये कोरोनाचा कहर, महिलेचा मृत्यू, दिवसभरात चार नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

शिरूर तालुक्यात आज दिवसभरात कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यात आज दिवसभरात कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  

मुंबईतील 52 वर्षीय व्यक्ती पत्नी व दोन मुलांसह बुधवारी (ता. 27) शिरूर शहरातील गजबजलेल्या प्रितम प्रकाश नगर परिसरात नातेवाइकाकडे आली होती. त्याबाबत माहिती कळल्यावर नगर परिषदेने काल त्यांना "होम क्वारंटाइन' केले होते. दरम्यान, या व्यक्तीची 19 मे रोजी मुंबई महापालिकेच्या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शोध घेतला. त्यावेळी संबंधित व्यक्ती शिरूरला गेली असल्याचे समजल्यावर शिरूर महसूल विभाग व आरोग्य विभागाला त्याबाबत कळविले. दरम्यान, या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबीयांसह सायंकाळी शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात आणले. त्यावेळी त्यांच्या मुलातही संशयास्पद लक्षणे आढळली. त्यामुळे दोघांनाही औंध रूग्णालयात हलविले. हे पाहुणे ज्यांच्या घरी आले होते, त्या कुटुंबातील सहा जणांना क्वारंटाइन केले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

शिरूर शहरातील महादेवनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्याने काल दुपारी येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना पुण्यातील ससून रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान केलेल्या तपासणीत त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आज दुपारी संबंधित महिलेचा मृत्यु झाला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

उद्या शहर बंद
" कोरोना' चा कहर सुरू झाल्यापासून शिरूरकरांनी जिद्दीने व एकजुटीने कोरोनाचे संकट रोखले होते. साठ हजारांची लोकसंख्या, त्यात तरंगत्या लोकसंख्येची भर, दाटीवाटीने उभी असलेली घरे, गल्लीबोळा, झोपडपट्ट्या आणि सर्व जातीजमातींचा भरणा, असे असूनही शिरूरकरांना गेल्या दोन महिन्याच्या संकटकाळात दिलासा मिळाला होता. मात्र, आज एकाच दिवसात दोन केसेस समोर आल्याने शिरूरकरांच्या पायाखालची वाळू सरकली. नगर परिषदेने तातडीने हालचाल करून दोन्ही परिसर सील केले. उद्या शहर बंद ठेवले जाणार असल्याचे नगर परिषदेने कळविले. 

अण्णापूरमधील ५२ वर्षीय व्यक्तीला बाधा 
शिरूर शहरापासून जवळच असलेल्या अण्णापूर येथील आणि गेल्या काही दिवसांपासून शहरातीलच एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीच्या घरी ठाणे येथून काही पाहुणे राहायला आले होते. त्यांच्यापासूनच हा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. 

या बाधित व्यक्तीला उपचारासाठी पुण्यातील केईएम रुग्णालयात हलविले असून, त्याच्या संपर्कातील व्यक्तींबरोबरच; ते ज्या दवाखान्यात उपचारासाठी येत होते तेथील १४ जणांना क्वारंटाइन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. अण्णापूर येथील लोकांची शिरूरला विविध कामानिमीत्त दैनंदिन ये-जा चालू असते. शिवाय बाधित व्यक्तीवर शहरातीलच एका रूग्णालयात उपचार झाल्याने व त्याचा एक्‍स रे देखील येथील एका लॅबमधून काढल्याने शहरातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

शिक्रापुरात आणखी एक पॉझिटिव्ह 
शिक्रापूर :
येथे चार दिवसांपूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित वडिल व मुलाच्या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे 24 मे रोजी निष्पन्न झाले. त्याच दिवशी घरातील अन्य पाच जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले. यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. 

दहिवडीच्या महिलेस कोरोनाचा संसर्ग 
न्हावरे : दहिवडी (ता.शिरूर) येथील तेवीस वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांनी दिली. 

बाधित महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला शनिवारी (ता. 23) न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. 23 मे रोजी तिच्या प्रसुतीवेळी करण्यात आलेल्या उपचारादरम्यान तिचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर स्वॅब तपासणी अहवालामधून ही महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे रात्री (ता. 28) उशिरा समजले. महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन सतर्क झाले असून, सरपंच संतोष दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम हाती घेतले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona woman dies in Shirur taluka, four new patients in a day