esakal | पुण्यात 'या' 8 ठिकाणी जमावबंदीची शक्यता; महापालिकेचा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-pune

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ ठिकाणी जमावबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना आज (रविवारी) संध्याकाळी पाठविला.

पुण्यात 'या' 8 ठिकाणी जमावबंदीची शक्यता; महापालिकेचा प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ ठिकाणी जमावबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना आज (रविवारी) संध्याकाळी पाठविला. प्रस्तावात पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे. परिणामी, पुण्यात 22 ठिकाणी अप्रत्यक्षपणे संचारबंदी लागू होण्याची शक्‍यता आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रस्तावामध्ये जमावबंदीच्या कालावधीचा उल्लेख नाही. त्यावर महापालिका, पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी संयुक्त निर्णय घेतील, असे समजते. महापालिका क्षेत्रीय कार्यालयांसह 19 ठिकाणी शंभर मीटर परिसरात, एका ठिकाणी दोनशे मीटर परिसरात तर दोन ठिकाणी पाचशे मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या माहितीला गायकवाड आणि नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला. या प्रस्तावावर आज रात्री अभ्यास करून उद्या (सोमवारी) निर्णय घेणार असल्याचे वेंकटेशम यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात आपत्कालीन उपयोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखण्याची आवश्‍यकता प्रशासनाला वाटते आहे. शासकीय, निमशासकीय व खासगी या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्यामुळे आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी फौजदारी कायद्यातील तरतुदीनुसार जमावबंदी (कलम 144) लागू करण्यात यावी, असे गायकवाड यांनी प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर ही जमावबंदी लागू होणार आहे. 

जमावबंदी ​ लागू होणारी ठिकाणे अशी... 
100 मीटर ः 
1) डॉ. नायडू हॉस्पिटल : हॉस्पिटल व परिसर 
2) सारसबाग येथील सणस स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स : परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी या ठिकाणी विलगीकरण कक्ष आहे. तेथे त्यांचे नातेवाईक आणि परिचित व्यक्तींची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने या कॉम्प्लेक्‍सचा परिसर. 
3) सिंहगड रस्त्यावरील कै. लायगुडे हॉस्पिटल : येथे विलगीकरण कक्ष आहे. हॉस्पिटल आणि परिसरात गर्दी टाळण्यासाठी परिसरात. 
4) पुणे महापालिकेची मुख्य इमारत : शासकीय व अन्य कामांकरिता शहरातील विविध भागांतून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मुख्य इमारत व आजूबाजूचा परिसर. 
5) महापालिकेची सर्व 15 क्षेत्रीय कार्यालये : शासकीय व अन्य कामांकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने सर्व महापालिका सहायक आयुक्त व उपायुक्त कार्यालय आणि परिसर. 

200 मीटर ः 
6) हडपसर औद्योगिक वसाहत : या ठिकाणी महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. या ठिकाणी अनावश्‍यक एकत्रित येणाऱ्या नागरिकांमध्ये विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 200 मीटरचा परिसर. 

500 मीटर ः 
7) फुरसुंगी : या ठिकाणी महापालिकेचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी अनावश्‍यक एकत्रित येणाऱ्या नागरिकांमध्ये विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या परिसरात. 
8) उरुळी देवाची : या ठिकाणी महापालिकेचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी अनावश्‍यक एकत्रित येणाऱ्या नागरिकांमध्ये विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या परिसरात. 

येथे आहेत महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये ः 
येरवडा - कळस, धानोरी 
ढोले पाटील रोड 
नगर रोड - वडगाव शेरी 
वारजे - कर्वेनगर 
सिंहगड रोड 
धनकवडी - सहकारनगर 
वानवडी - रामटेकडी 
हडपसर - मुंढवा 
कोंढवा - येवलेवाडी 
भवानी पेठ 
बिबवेवाडी 
कसबा ः विश्रामबागवाडा 

loading image
go to top