कोरोना व्यवस्थापनाला "डेटा'चे इंधन 

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

प्रशासनाच्या निर्णयाला दिशा देणारा "डेटा' आणि कोरोनाबाधिताचे निदान, स्क्रिनिंग, उपचार पद्धतीसाठी उपयोगात येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता कोरोना साथीतील व्यवस्थापनासाठी एक प्रकारचे इंधनच आहे. 

पुणे- कोरोनाबाधिताला शोधण्यापासून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यापर्यंत सर्वच यंत्रणांसाठी "डेटा' हे महत्त्वपूर्ण शस्त्र ठरत आहे. वैश्‍विक साथीच्या व्यवस्थापनासाठी डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर अनिवार्य आहे. प्रशासनाच्या निर्णयाला दिशा देणारा "डेटा' आणि कोरोनाबाधिताचे निदान, स्क्रिनिंग, उपचार पद्धतीसाठी उपयोगात येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता कोरोना साथीतील व्यवस्थापनासाठी एक प्रकारचे इंधनच आहे. नीती आयोगातर्फे कोरोना काळात संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योगांसाठी केंद्रीय पद्धतीने ऊर्जा आणि डेटा व्यवस्थापनासाठी कृती अहवाल तयार करायला सुरुवात केली आहे. ज्या समितीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अजय साव्हनी करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनासंबंधी "डेटा' - 
1) वैयक्तिक डेटा - कोरोनाबाधित व्यक्तीचे नाव, वय, लिंग, राहण्याचे ठिकाण, प्रवास व आरोग्याचा तपशील. 
2) वैद्यकीय डेटा - प्रसार व बरे होण्याचा दर, मृत्यूदर, औषधांना रुग्णाने दिलेल्या प्रतिसाद, रुग्णालयातील मनुष्यबळ आणि साहित्य. 
3) प्रशासकीय डेटा - लोकवस्ती, वाहतूक, दुकाने, रुग्णालये, अत्यावश्‍यक सेवा केंद्र, प्रशासनाकडे असलेली माहिती. 

प्रशासकीय व्यवस्थापनात "डेटा'ची भूमिका - 
1) संसर्गित व्यक्तीचा शोध - 

- विदेशातून येणाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण, वय, व्यवसाय, वैद्यकीय तपशील आणि मूळ गाव या माहितीचे संकलन. 
- संशयितांचे विलगीकरण तर, इतरांची माहिती स्थानिक प्रशासनाकडे देणे. 
- वाढता धोका लक्षात घेता 10 जानेवारी नंतर भारतात आलेल्यांचा शोध व तपासणी. 
- बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही, स्थानिक प्रशासनाकडील डेटाच्या आधारे घेणे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

2) प्रतिबंधित क्षेत्राचे व्यवस्थापन - 
- कोरोनाबाधितांच्या निवासाच्या तपशिलावरून प्रतिबंधित क्षेत्रासंबंधी निर्णय घेता आले. 
- बाधितक्षेत्रात कोरोनाचा प्रसार का होतोय? त्याची कारणे आणि उपाययोजना शक्‍य झाल्या. 
- संपूर्ण परिसरातील वैद्यकीय तपासणीत वय, ठिकाण, लक्षणे, प्रवासाची माहिती आदींचे संकलन. 
- त्यावरून क्षेत्रातील संभाव्य बाधितांची संख्या आणि भविष्यकालीन व्यवस्थापन केले. 

3) डेटाच्या आधारावरील व्यवस्थापन - 
- प्रतिबंधित क्षेत्र वगळून नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा, औषधे, संभाव्य गरजा. 
- नागरिकांना प्रवास आणि बाहेर पडण्यासाठी ऑनलाइन निर्णय प्रक्रिया. 
- परगावात जाणारे नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांच्या संबंधीचे व्यवस्थापन. 
- विलगिकरण कक्षांची संख्या, क्षमता, त्यांची भविष्यातील गरज. 

वैद्यकीय क्षेत्रात "डेटा'ची भूमिका - 
1) कोरोनाचे निदान - 

- प्रशासनाकडे व्यक्तीच्या उपलब्ध डेटा, आरोग्याचा इतिहास आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे संशयितांचे निदान. 
- निदान झालेल्या नागरिकांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे निदानाचे तंत्रज्ञान (फुफ्फुसाच्या एक्‍स-रेच्या आधारे निदान.) 

2) रुग्णालयातील व्यवस्थापन - 
- संभाव्य वाढती संख्या आणि उपलब्ध रुग्णालयांची संख्या. 
- अतिदक्षता विभागातील वैद्यकीय संयंत्र, मास्क, पीपीई कीट्‌सचा पुरवठा. 
- परिचारिका, डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या आरोग्य स्थितीनुसार व्यवस्थापन माहितीच्या आधारावर केले. 

3) कोरोनाच्या उपचारासाठी डेटा - 
- मधुमेह, हृदयाशी निगडित आजार, कर्करोग आदी दुर्धर आजार असलेल्या आणि नसलेल्या कोरोनाबाधितांची उपचारांबाबत माहिती भविष्यकालीन उपचार व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण. 
- रुग्णाचे वय, लिंग, व्यवसाय, जीवनशैली, प्रतिकारशक्ती आणि बरे होण्याची क्षमता आदी डेटा. 

पोस्ट कोविड व्यवस्थापनासाठी "डेटा' - 
- सध्याच्या "डेटा'वरून भविष्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका कोणकोणते घटक, परिसर, व्यवसाय, वय असलेल्या लोकांना आहे, याचा शोध घेता येणार. 
- प्रसाराचा दर आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व्यवस्थापन. 
- सध्याच्या "डेटा'च्या आधारे भविष्यात नगर नियोजन, वैद्यकीय, वाहतूक आणि अत्यावश्‍यक सेवांचे नियोजन करणे शक्‍य. 
- वैद्यकीय आणि समाजशास्त्रीय संशोधनासाठी डेटाचा वापर होणार. 

कोरोनासंबंधी व्यवस्थापनासाठी सर्व क्षेत्रातील माहितीचे एका ठिकाणी इंटिग्रेटेड स्वरूपात संकलन आणि पृत्थकरण व्हायला हवे. जेणेकरून प्रशासनाला निर्णय घेताना त्याचा उपयोग तर होईल, परंतु निर्णयांचा वेग आणि अचूकता अधिक वाढेल. 
- डॉ. सुभाष साळुंखे,  तांत्रिक सल्लागार, राज्य सरकार 
 

कोरोनाच्या प्रसाराचे अनुमान काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटाची गरज पडते. वैश्‍विक साथीमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि नुकसानीच्या अंदाजासाठी माहितीचे योग्य संकलन आणि पृत्त्थकरण होणे गरजेचे आहे. 
- डॉ. कौशलेंद्र कुमार, वरिष्ठ वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शास्त्र संस्था, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus : Data is becoming an important for all systems