वाट बघतोय रिक्षावाला; पुण्यातील परिस्तिथी

Rickshaw
Rickshaw

पुणे - त्यांच्यासाठी ती म्हणजे नखऱ्याची नारच; मात्र एकीकडे पेट्रोलबरोबरच भडकलेले सीएनजी गॅसचे दर अन् दुसरीकडे दुरावलेले प्रवासी यामुळे त्यांची नार हिरमुसलीय. परिणामी कुटुंब जगवायचं कसं, हा प्रश्‍न त्यांच्यापुढं ठाकलाय.

...ही दाहक व्यथा आहे पुण्यातील रिक्षाचालकांची. कोरोनाच्या लॉकडाउनने पुरते भरडलेले रिक्षाचालक आता वाट पाहताहेत ती परिस्थिती निवळण्याची! ‘कोरोना मरो आणि आमचं संकट सरो’ हाच सूर ‘सकाळ’शी बोलताना त्यांच्या ओठी होता. 

भल्या सकाळी घर सोडायचं. रात्री दहा-अकरापर्यंत व्यवसाय करायचा. फिर फिर फिरायचं, तेव्हा कुठे दोनशे ते चारशे रुपये मिळतात. त्यातूनच गॅस आणि  मेंटनन्सचा खर्च भागवायचा. मग हातात राहतात ते किती? घरी जाताना पोरांना काय खायलाही नेता येत नाही, अशी विदारकता रिक्षाचालकांनी मांडली. 

शहरात लाखभर रिक्षा आहेत. यातील अनेक रिक्षाचालक हे पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील आहेत. तर शहरात झोपडपट्ट्या तसेच पुनर्वसित वसाहतीत रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे. गावाकडील अनेक रिक्षाचालकांकडे घरची एकर-दोन एकर शेती आहे. शहरात भाड्याच्या घरात राहून ते व्यवसायाबरोबरच गावाकडची शेती येऊन-जाऊन करताहेत. सध्या उन्हाळ्यामुळं शेतीतही काही काम नाही. तसेच रिक्षांना भाडी मिळत नसल्यानं अनेकांना घराचं भाडंही भरता येईना. ज्यांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत, त्यांना फायनान्स कंपन्या, बँकांचे हप्तेही भरता येईनात. हप्ते थकल्याने अनेकांच्या रिक्षा कंपन्यांनी ओढून नेल्या आहेत. त्यामुळं संसार चालवायचा कसा, या प्रश्‍नानं त्यांची झोपही उडालीय.

रिक्षाचालकांच्या अपेक्षा

  • शाळा, महाविद्यालये लवकर सुरू व्हावीत
  • पेट्रोल, गॅसचे दर कमी करावेत
  • सरकारने रिक्षाचालकांना पॅकेज द्यावे
  • ‘आरटीओ’ने पासिंगसाठी मुदतवाढ द्यावी
  • फायनान्स कंपन्या, बँकांनी तगादा लावू नये

व्यवसायावर परिणाम; कुटुंब जगविण्याचा प्रश्‍न
व्यवसाय पूर्ण मोडून पडलाय; पण याच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं कसंतरी रेटावं लागतंय. चार-पाच महिन्यांचं घरभाडं थकलय. कुटुंब कसं जगवतोय, ते माझं मलाच ठाऊक.
- आनंदा दिघे, रिक्षाचालक, गुलाबनगर, धनकवडी

लॉकडाउननंतर व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, असं वाटलं होतं; पण आजही दोन दोन तास भाडे लागत नाही. हप्ते थकल्याने अनेकांच्या गाड्या फायनान्सवाल्यांनी ओढून नेल्या आहेत. 
- चंद्रकांत गोगावले, रिक्षाचालक गुलाबनगर, धनकवडी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षांच्या पासिंगला मुदतवाढ देणं, हा धोरणात्मक प्रश्‍न आहे. याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय होत नाही. परिवहन आयुक्त कार्यालय याबाबत निर्णय घेईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.   
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

गाडीसाठी फायनान्सचं कर्ज काढलं. महिना चार हजार हप्ता आहे. व्यवसाय नसल्यानं हप्ताही भरता येईना. कंपनीतून रोज पैशासाठी फोन येतोय. पुण्यात राहणंही परवडेना. त्यामुळं गावी जायचा निर्णय घेतला.
- संदीप दिघे, रिक्षाचालक स्वारगेट

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com