कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

पुणे : पुणेकरासांठी येणारा प्रत्येक दिवस काहीतरी वेगळंच घेऊन येतोय. त्यामुळं उद्या कोरोना काय वेगळी बातमी घेऊन येईल, या भीतीच्या वातावरणातच सध्या पुणेकर जगताहेत. मात्र, सोमवारी (ता. 18) काहीशी दिलासा देणारी गोष्ट घडली. त्याच झालं असं, गेले दोन दिवस कायम असलेला दोनशे कोरोनाबाधितांचा आकडा सोमवारी निम्म्यावर आलाय. म्हणजे दिवसभरात केवळ 102 रुग्णच सापडलेत. त्यातही आनंदाची बाब म्हणजे 49 जण कोरोनामुक्त झालेत. मात्र, चिंताजनक बाब अशी, की पाच जणांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा हा दोनशेच्या घरात गेलाय. गंभीर म्हणजे त्यात 20 वर्षांच्या तरुणीचा समावेश होता.

सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 148 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, 50 जण व्हेंटिलेटरवर असल्याचं महापालिकेच्या आरोग्य खात्यानं स्पष्ट केलंय. तसंच, 1599 रुग्णांवर उपचार चालू आहेत. पुण्यात आतापर्यंत जवळपास 32 हजार 236 जणांचे घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केलीय. त्यातही तीन हजार 598 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. त्यात 199 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 1800 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेलेत. अजून 148 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल सोमवारी दिवसभरात ज्या पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात हडपसरची 20 वर्षांची महिलाही होती. तिची नुकतीच प्रसूती झाली होती. तिला प्रसूतीनंतर त्रास होऊ लागल्यानं पालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु, रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. तिला इतरही काही आजार होते. त्यात कोरोनाने तिला गाठलं. सुदैवाने तिच्या बाळाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. मात्र, तिच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतेय. 

हे प्रयत्न चाललेत...
कोरोनाला रोखण्यासाठी शहरात दररोज सरासरी दीड हजार नागरिकांची तपासणी केली जातेय. त्यातही यापुढे दररोज पाच हजार तपासण्या करण्याचं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच नियोजन असल्याचं त्यांनी सोमवारीच स्पष्ट केलं. याशिवाय रुग्णांच्या संपर्कात जे आलेत, त्यांचेही स्वॅब घेऊन उपचार केले जाताहेत. घरोघरी जाऊनही नागरिकांची तपासणी सुरूय. यासाठी खास रुग्ण व संशयितांकरिता महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील सेवासुविधा वाढविण्यात आल्या. संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविल्यामुळं निगेटिव्ह असलेल्यांना वेगळं ठेवण्याचीही सोय पालिकेनं केलीय.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या थोपविण्यासाठी पालिकेकडून विविध स्थरांवर उपाय केले जाताहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचं दिसतंय. त्यातही गेल्या दोन दिवसांची दोनशेपार रुग्णांची संख्या महापालिका व पुणेकरांची चिंता वाढवतेय. दुसऱ्या बाजुला लॉकडाउनमध्ये काही दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी सवलती दिल्यात. यामुळं कोरोना आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी एक दिलासादायक बातमी म्हणजे रुग्ण कमी होण्याबरोबरच बरे होणाऱ्यांचं प्रमाण हे आशादायी असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं. शहरातील व्यवहार सुरू करताना लोकं गर्दी करणार नाहीत, याचीही काळजी घेतली जातेय. तर पोलिसांच्या माध्यमातून रस्त्यांवर बॅरिकेड लावल्याचं पालिका आयुक्त गायकवाड यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com