सांगोला तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याच्या चालकाला ७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; मंडळ अधिकाऱ्यांसह चालकावर गुन्हा दाखल
७ लाखांची लाच घेताना मंडलाधिकाऱ्याचा चालक चतुर्भुज
सांगोल्यात ‘लाचलुचपत’ची कारवाई सापळा; मंडलाधिकारी नाईकसह दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ६ : सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ५) सापळा रचून मंडल अधिकाऱ्याच्या खासगी चालकाला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडल अधिकारी विजया महारुद्र नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खासगी चालक वैभव पिराजी मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी नाईक यांच्या वतीने १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ७ हजारांवर निश्चित करण्यात आली. तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष केली. त्यावेळी मंडलाधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे याच्यामार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान चालक वैभव मोरे याने तक्रारदाराकडून ७ हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या कारवाईत लाचेची रक्कम, संशयित आरोपीचा शर्ट, मोबाईल तसेच चित्रीकरणाचे मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार तपास करीत आहेत.
---
चौकट
सरपंच अन् नागरिकांनी केल्या होत्या तक्रारी
संगेवाडी मंडल अधिकारी विजया नाईक यांच्या कामकाजाबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. मंडलातील काही गावांच्या सरपंचांनीही सह्यांसह तत्कालीन तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे तक्रार देऊन त्यांची बदली करण्याची मागणी केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागाच्या कामकाजाबाबत तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
---
चौकट
दोन दिवसांपूर्वीच महसूल पथकावर हल्ला
तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर दोन दिवसांपूर्वीच हल्ला झाला होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोघांना नऊ तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. महसूल पथकावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच, महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर लाचखोरीची कारवाई झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

