पावणेसहा कोटी रुपये परत मिळविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्विचवर (सर्व्हर) सायबर हल्ला चढवून सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेल्या तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात पाच कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी रक्कम मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सायबर हल्ल्यात परदेशात नेलेली मोठी रक्कम परत मिळविण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्विचवर (सर्व्हर) सायबर हल्ला चढवून सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेल्या तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात पाच कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी रक्कम मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सायबर हल्ल्यात परदेशात नेलेली मोठी रक्कम परत मिळविण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणातील १३ कोटी ९२ लाखांची रक्कम हाँगकाँगमधील हॅनसेंग बॅंकेमधील ए. एल. एम. ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर गुन्हेगारांनी वर्ग केली होती. घटनेनंतर सायबर पोलिसांनी तत्काळ संबंधित बॅंक व हाँगकाँग पोलिसांशी संपर्क साधून कॉसमॉस बॅंकेतर्फे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी ही रक्कम गोठविण्यास पहिल्यांदा प्राधान्य दिले. त्यानंतर हॅनसेंग बॅंक व तेथील पोलिसांमध्ये समन्वय साधण्यात आला. याबरोबरच केंद्र सरकारच्या  परराष्ट्र मंत्रालयामार्फत हाँगकाँग येथील दूतावासातील अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रकरण मांडण्यात आले. त्यानुसार सायबर पोलिसांकडून हाँगकाँग पोलिस, तेथील दूतावास यांच्यामार्फत बॅंकेकडे पाठपुरावा सुरू होता. डिटेक्‍टिव्ह हाँगकाँग पोलिसमधील तपास अधिकारी पॅंग यान लोक यांच्यासमवेत पोलिसांनी समन्वय ठेवला. लोक यांनी सांगितल्यानुसार कॉसमॉस बॅंकेने तेथील न्यायालयात दिवाणी दावा (सिव्हिल सूट) दाखल करून पाठपुरावा केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम कॉसमॉस बॅंकेकडे वर्ग करण्यात आली.

सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, त्यानंतर पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, पोलिस कर्मचारी अजित कुऱ्हे, संतोष जाधव यांच्या पथकाने तपासाला गती दिली. या प्रकरणातील १८ आरोपींना अटक केली. मुख्य आरोपीचा नेपाळपर्यंत पाठलाग केला. परंतु, त्याने परदेशात पलायन केले. 

पोलिसांकडून सलग ४८ तास काम
सायबर हल्ल्यानंतर पोलिसांनी ३५० बॅंकांशी तत्काळ संपर्क साधला. सलग ४८ तास, दोन रात्री जागून पोलिसांनी बॅंकांना ई-मेल पाठवून पैसे गोठविण्याबरोबरच संबंधित बॅंकांचे एटीएम फुटेजही राखून ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये मोठ्या प्रमाणात मदत झाली. याच सीसीटीव्हीमुळे १८ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून काही लाखांची रक्कम जप्त करता आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cosmos Bank Cyber Attack