Cotton rates : ‘सीसीआय’मुळे कापूस दराला आधार

खरेदी सुरू : शेतकऱ्यांना दिलासा; प्रमाण किती राहणार हेही महत्त्वाचे
Cotton rates Support for cotton price due to CCI  Relief for farmers
Cotton rates Support for cotton price due to CCI Relief for farmers sakal

जळगाव/ पुणे : कापसाचे दर नरमल्यामुळे मागील काही दिवसांपासून शेतकरी चिंतेत होते. कापसाचे दर पडणार असल्याच्या गावगप्पा जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. मात्र आता भारतीय कापूस महामंडळाने अर्थात ‘सीसीआय’ने बाजारभावाने कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कापूस बाजार आणखी मजबूत स्थितीत आला. ‘सीसीआय’च्या खरेदीमुळे कापूस दरात सुधारणा होण्यासाठी बळ मिळू शकते, मात्र सीसीआय नेमका किती कापूस खरेदी करेल, यावर सगळी गणिते अवलंबून आहेत. देशातील कापूस बाजार डिसेंबरमध्ये नरमला होता. कापूस दर क्विंटलमागे सरासरी ८०० रुपयांनी तुटले होते. मागील काही दिवसांपासून कापूस बाजार ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या तुलनेत चालू महिन्यातील बाजारातील आवक काहीशी जास्त आहे. त्यामुळे दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत चढ-उतार होत राहिले.

बाजारातील दरपातळी पाहून शेतकऱ्यांचीही चिंता वाढली होती. मात्र आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्के कमी कापूस विकला. दर वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. शेतकरी कापूस विकत नाही म्हटल्यावर उद्योगांनी लॉबिंग सुरु केले. केंद्र सरकारकडे कापसावरील ११ टक्के आयातशुल्क रद्द करण्यासाठी तगादा लावला. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. कापसाच्या दरात सुधारणा होणार नाही, दर पुढील काळात कोसळतील, असे संदेश व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. पण सीसीआय खरेदीत उतरल्याने या चर्चांनाही महत्त्व उरले नाही. दरम्यान, सीसीआय नेमका किती कापूस खरेदी करेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ‘सीसीआय’ने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कापसाचे दर नक्कीच वाढतील. मात्र ‘सीसीआय’ची खरेदी कमी राहिल्यास बाजाराला आधार मिळण्याची शक्यता मर्यादित राहील.

‘सीसीआय’ करणार बाजारभावाने खरेदी

‘सीसीआय’ने ८ हजार ४०० रुपये दर जाहीर केला होता. एरवी ‘सीसीआय’कडून हमीभावाने कापूस खरेदी केली जाते. परंतु यंदा मात्र ‘सीसीआय’ने बाजारभावाने कापूस खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. बाजारात ‘सीसीआय’सारखा मोठा खरेदीदार उतरला आहे. त्यामुळे कापूस खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. परिणामी बाजार टिकून राहील, असे अभ्यासकांनी सांगितले.

दर सुधारण्यास मदत

जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असे कापूस बाजारातील अभ्यासक सांगत होते. आता ‘सीसीआय’ने बाजारभावानुसार कापूस खरेदी सुरु केल्यामुळे दराला आधार मिळू शकतो. ‘सीसीआय’च्या खरेदीमुळे कापसाच्या दराचा नवीन बेंचमार्क तयार होईल, त्याखाली बाजार जाणार नाही. तसेच दरात सुधारणा होण्यास मदत होईल, असे जाणकारांनी सांगितले.

‘सीसीआय’च्या खरेदीमुळे कापूस बाजार आणखी मजबूत स्थितीत येईल. मात्र नेमका किती कापूस खरेदी होणार आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. यावरच परिणाम अवलंबून राहील.

- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार

‘सीसीआय’च्या खरेदीमुळे कापूस बाजाराला आधार मिळेल. कापूस खरेदीत स्पर्धा निर्माण होऊन दर वाढू शकतात. सीसीआय कापसाची चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे.

- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com