

कापूस बियाण्यावरही
लिंकिंगचा प्रकार
अधिक मागणीच्या वाणांसाठी वितरक, विक्रेत्यांचा आटापिटा
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः कापूस पिकासाठीचा अधिक खर्च व तोटा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच नव्या हंगामात कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे वित्तीय शोषण करण्यासाठी नफेखोर योजना आखल्या जात असून, अधिक मागणीच्या वाणांवर लिंकिंग केले जात असल्याची कुजबूज आहे.
कापूस बियाण्याचा ९८ टक्क्यांवर पुरवठा खासगी कंपन्या करतात. यात काही कंपन्यांच्या वाणांना मागणी असते. यंदा लागवड घटीमुळे मागणी कमी राहणार आहे. परंतु अशातही कापूस बियाण्याची कृत्रिम टंचाई तयार करून ते वितरकांना लिंकिंगने देण्याचा प्रकार काही कंपन्यांकडून केला जात आहे.
वितरकांना लिंकिंगने अधिक मागणीचे वाण मिळाल्यानंतर वितरक पुढे विक्रेत्यांना लिंकिंगशिवाय हे वाण देणार नाहीत. विक्रेतेही आपल्या व्यवसायासाठी हे वाण लिंकिंगने वितरकांकडून घेतील. पुढे शेतकऱ्यांनाही लिंकिंगशिवाय ते मिळणार नाही. असा प्रकार दर वर्षी खानदेशात होताना आढळतो.
खतांच्या लिंकिंगबाबत जेवढ्या तक्रारी विक्रेते करीत आहे, तेवढ्या तक्रारी कापूस बियाण्यावरील लिंकिंगबाबत केल्या जात नसल्याचा मुद्दाही सध्या चर्चेत आहे.
रासायनिक खतांवर शेतकऱ्यांना नको असलेले अन्नद्रव्य, संप्रेरके किंवा विद्राव्य खते खतविक्रेते देत असतात. असाच प्रकार कापूस बियाण्याबाबत सुरू आहे. कापूस बियाणे उत्पादक कंपन्या किंवा बियाणे पुरवठादार प्रथम बियाणे आपल्या वितरकाकडे पाठवितात. वितरकाला हे बियाणे देताना लिंकिंग केली जात आहे. यात कमी मागणीच्या बियाण्याची सक्तीने खरेदी करण्यास वितरकांना भाग पाडले जात आहे. पुढे वितरक हेच लिंकिंग केलेले कापूस बियाणे किरकोळ विक्रेते, कृषी केंद्रांना देतात. आणि नको असलेले कापूस बियाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागते. या लिंकिंगमध्ये नफेखोरी आहे. शिवाय शेतकऱ्यांची पिळणूकही होणार आहे.
कृषी विभाग सुस्त
विक्रेते, संघटनांच्या आग्रहानंतर कापूस बियाणाची विक्री १५ मे पासून सुरू होणार आहे. परंतु हे बियाणे किती व कसे येणार आहेत? त्याचा पुरवठा व मागणी, अधिक मागणीचे वाण व त्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची भूमिका याची कोणताही माहिती कृषी विभाग, गुणवत्ता व नियंत्रण विभाग घेत नसल्याची स्थिती आहे. कापूस बियाणे वितरण, विक्रीतील लिंकिंग व कृत्रिम टंचाई याबाबत योग्य त्या सूचना पुरवठादार, वितरकांना कराव्यात, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.