हमीभाव

हमीभाव
Published on

कापूस हमीभावात
५५७ रुपयांनी वाढ

खरीप २०२६-२७ साठीचे दर जाहीर; सोयाबीनला ३८० रुपयांची वाढ

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोयाबीनच्या हमीभावात केंद्र सरकारने ३८० रुपयांची, तर कापसासाठी ५५७ रुपयांची वाढ केली आहे. तुरीला ४५० रुपयांची, तर सूर्यफुलासाठी सर्वाधिक ६२२ रुपयांची वाढ देण्यात आली आहे. मका केवळ १० रुपयांनी वाढविला आहे. एल निनोचे सावट आणि खत संकट असतानाही केंद्र सरकारने हमीभावात कमी वाढ केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१३) खरीप हंगाम २०२६-२७ साठी १४ पिकांसाठी हमीभाव जाहीर केले आहेत. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोमुळे कमी पावसाचे सावट आहे. तर खत टंचाईदेखील आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खरिपातील पिकांसाठी किती हमीभाव जाहीर करते, यात कोणत्या पिकाच्या हमीभावात भरीव वाढ केली जाते, याकडे लक्ष होते. परंतु सरकारने शेतकऱ्यांची निराशा केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारने सूर्यफुलासाठी सर्वाधिक ६२२ रुपयांची वाढ केल्याने त्यासाठीचा हमीभाव आता ८ हजार ३४३ रुपयांवर पोचला आहे. तर, भाताच्या हमीभावात केवळ ७२ रुपयांची वाढ केली आहे. ‘ए’ ग्रेडच्या भाताचा हमीभाव आता दोन हजार ४६१, तर साधारण भाताचा हमीभाव दोन हजार ४४१ रुपयांपर्यंत वाढविला आहे. भातासाठी उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा दिल्याचाही दावा सरकारने केला आहे. ज्वारीच्या हमीभावात ३२४ रुपयांची वाढ केली आहे. हायब्रीड ज्वारीला ४ हजार २३ रुपये आणि मालदांडी ज्वारीला ४ हजार ७३ रुपये दर जाहीर केला आहे. बाजरीच्या भावात १२५ रुपयांची वाढ केली असल्याने २ हजार रुपये हमीभाव असणार आहे.

तुरीत ४५०, तर
मुगाला १२ रुपये वाढ
तुरीच्या हमीभावात सरकारने यंदा ४५० रुपयांची वाढ केली आहे. तुरीला नव्या हंगामात ८ हजार ४५० रुपये हमीभाव असणार आहे. मुगाला केवळ १२ रुपयांची वाढ केल्याने हमीभाव ८ हजार ७८० रुपये झाला आहे. उडदासाठी ४०० रुपयांची वाढ केली असून त्यासाठी आता ८ हजार २०० रुपयांवर हमीभाव पोचला आहे.

तेलबियांमध्ये अपुरी वाढ
केंद्र सरकारने सूर्यफुलाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली असली तरी इतर पिकांचे हमीभाव कमी प्रमाणात वाढवले आहेत. राज्याचे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा हमीभाव ३८० रुपयांनी वाढला आहे. यंदा सोयाबीनला ५ हजार ७०८ रुपये हमीभाव असणार आहे. तर तिळासाठी ५०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे तिळाला यंदा १० हजार ३४६ रुपये हमीभाव असणार आहे. भुईमुगासाठी २५४ रुपयांची वाढ आहे. तर कारळाला ५१५ रुपयांची वाढ आहे.

कापसाचा हमीभाव
८ हजार ६६७ रुपये
केंद्र सरकारने लांब आणि मध्यम धाग्याच्या कापसासाठी हमीभावात ५५७ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ६६७ रुपये, तर मध्यम धाग्याच्या कापसाला हमीभाव ८ हजार २६७ रुपये मिळाला आहे. कापसाचा उत्पादन खर्च आणि हेक्टरी उत्पादकता पाहता हमीभावातील वाढ अपुरी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दीडपट हमीभावाचा दावा
हमीभाव जाहीर करताना सरकारने सर्वच पिकांसाठी उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव जाहीर केल्याचा दावा केला आहे. पण केंद्र सरकारने पिकांचा उत्पादन खर्च अपुरा गृहित धरला आहे. स्वामिनाथन आयोगाने उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केलेली होती. पण हा उत्पादनखर्च सर्वसमावेशक असावा, अशी आयोगाची अपेक्षा होती. पिकांचा उत्पादनखर्च तीन प्रकारे मोजला जातो. ए-२, (ए-२ + FL) आणि सी-२.


ए-२ ः एखादे पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक कीटकनाशके, मजूर, सिंचन, इंधन इत्यादींसाठी जो खर्च येतो हा खर्च ए-२ मध्ये मोजला जातो.
ए-२ + FLः खर्चाची ही व्याख्या थोडी व्यापक असून यात ए-२ खर्चासह शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी गृहीत धरली जाते.
सी-२ः खर्चाची ही व्याख्या सर्वसमावेशक आहे. सी-२ मध्ये ए-२ + FL खर्चासोबतच ज्या जमिनीवर पीक घेतले जाते, त्या जमिनीचे आभासी भाडे, खंड आणि स्थायी भांडवली साधनसामग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजले जाते.
म्हणजेच सी-२ उत्पादन खर्चात सर्व प्रकारचा खर्च गृहित धरला जातो. पण सरकारने पुन्हा एकदा हातचलाखी करत सी-२ ऐवजी सी-२ + FL वर आधारित उत्पादन खर्च काढला आहे. व त्यावर ५० टक्के नफा दिल्याचा दावा केला आहे.

खरीप २०२६-२७ साठी विविध पिकांच्या हमीभावात केलेली वाढ (प्रति क्विंटल/रुपये)
पीक...२०२५-२६...२०२६-२७...वाढ...टक्के
सोयाबीन...५३२८...५७०८...३८०...७.१३
कापूस (लांब धागा)...८११०...८६६७...५५७...६.८७
कापूस (मध्यम धागा)...७७१०...८२६७...५५७...७.२२
तूर...८०००...८४५०...४५०...५.६३
उडीद...७८००...८२००...४००...५.१३
मूग...८७६८...८७८०...१२...०.१४
भात (सामान्य)...२३६९...२४४१...७२...३.०४
भात (ग्रेड अ)...२३८९...२४६१...७२...३.०१
ज्वारी (हायब्रीड)...३६९९...४०२३...३२४...८.७६
ज्वारी (मालदांडी)...३७४९...४०७३...३२४...८.६४
बाजरी...२७७५...२९००...१२५...४.५०
रागी...४८८६...५२०५...३१९...६.५३
मका...२४००...२४१०...१०...०.४२
भुईमूग...७२६३...७५१७...२५४...३.५०
सूर्यफूल...७७२१...८३४३...६२२...८.०६
तीळ...९८४६...१०३४६...५००...५.०८
कारळे...९५३७...१००५२...५१५...५.४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com