

सरळ कापूस वाण यंदाही अल्प
--
शेतकऱ्यांची होणार वणवण
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित कापूस वाणांची लागवड बऱ्यापैकी होते. परंतु हे वाण हवे तेवढे व हव्या त्या कंपनीकडून उपलब्ध होत नसल्याने त्यांचा यंदाही तुटवडा असणार आहे.
कापूस लागवडीत खानदेश अग्रेसर आहे. पूर्वहंगामी किंव बागायती कापसाची सुमारे दोन लाख हेक्टरवर खानदेशात लागवड होते. तर एकूण लागवड साडेआठ लाख हेक्टर एवढी असते. यात खानदेशात बेवडसाठी तापी, गिरणा,अनेर पट्ट्यात देशी किंवा सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते. परंतु मागील तीन-चार वर्षे दर्जेदार व मुबलक प्रमाणात सरळ वाण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. या वाणांसाठी शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातची वाट नाइलाजाने धरतात. यंदाही तशीच स्थिती असणार आहे. कारण यंदाही सरळ वाणांचा पुरवठा किती व कसा, केव्हा होईल, याचा कुठलाही आराखडा, नियोजन कृषी विभागाकडे नाही. कृषी यंत्रणांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे कापूस उत्पादकांसमोर सतत अडचणी येत आहेत.
खानदेशात सुमारे ४३ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज कापूस लागवडीसाठी आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २७ लाखांवर कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा होणार आहे. कापूस बियाण्याचा ९९ टक्क्यांवर पुरवठा खासगी कंपन्या, पुरवठादार करतात. या बियाण्यासाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. यात ९८ ते ९९ टक्के कापूस बियाणे बीटी (बोलगार्ड २) प्रकारातील असते. यात देशी कापूस बियाणे अल्प येते. त्यातही दर्जेदार सरळ किंवा देशी वाण उपलब्ध होत नाही. मागील हंगामात एका कंपनीने राज्यात किंवा खानदेशात आपले सरळ कापूस वाण उपलब्ध होणार नाहीत, बिजोत्पादन कार्यक्रमाचे नुकसान झाले होते, असे म्हटले होते.
चौकट
‘२०-२२ मे पर्यंत वाण उपलब्ध व्हावेत’
यंदाही खानदेशात २० हजार पाकिटेदेखील सरळ वाणांचा पुरवठा होणार नसल्याची स्थिती आहे. खानदेशात किमान पाच ते सहा लाख पाकिटे एवढी दर्जेदार सरळ कापूस वाणांची मागणी आहे. परंतु पुरवठा होत नाही. काही कंपन्यांचे सरळ वाण जूनच्या मध्यात येतात. या वाणांची गरज बागायती पट्ट्यात असल्याने त्यांचा पुरवठा २० किंवाी २२ मे पर्यंत कृषी केंद्रांत व्हायला हवा, असाही मुद्दा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.