esakal | पुण्यात पीएमपीच्या बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus

पुण्यात पीएमपीच्या बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - उत्पन्नाचे (Income) नवे स्त्रोत शोधण्यासाठी पीएमपीच्या बसमधून (PMP Bus) कुरिअर (Courier) आणि मालवाहतूक सेवा (Freight Service) सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने (PMP Administrative) घेतला आहे. शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पीएमपीचे दोन्ही महापालिकांवरील आर्थिक अवलंबित्त्व काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. (Courier and Freight will Start from PMPs Bus in Pune)

पीएमपीच्या ताफ्यात २२०० बस आहेत. त्यांचा वापर या सेवेसाठी होईल. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची १३ आगारं आहेत. तसेच प्रमुख ४० बस स्थानके आहेत. त्या ठिकाणी बसमधून करिअर किंवा मालवाहतूक करता येईल, अशी संकल्पना असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. या उपक्रमासाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात येईल. तिच्या माध्यमातून कुरिअर किंवा मालवाहतूक दिलेल्या पत्त्यावर करण्यात येईल. तसेच काही आगारांतून दुसऱ्या आगारांत कुरिअर अथवा माल पोचल्यावर नागरिकांना तेथूनही तो घेता येऊ शकेल. उदाः निगडी आगारातून कुरिअर अथवा काही वस्तू हडपसर आगारात पाठविल्या तर, तेथून संबंधितांना त्या वस्तू ताब्यात घेता येतील. त्यांना घरपोच त्या वस्तू हव्या असतील तर संबंधित एजन्सीच्या माध्यमातून त्या पोचविण्यात येतील. कुरिअर किंवा मालवाहतूक कंपन्यांच्या तुलनेत पीएमपीचे दर किफायतशीर असतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे शहर व जिल्ह्यातील नद्यांमधील अतिक्रमणे काढण्याचा आदेश

या उपक्रमासाठी पीएमपीच्या बसमध्ये किरकोळ स्वरूपात बदल करावे लागतील. पीएमपीच्या कार्यशाळेत ते बदल होऊ शकतील. तसेच चालक, वाहक यांना या बाबत प्रशिक्षणही दिले जाईल. एजन्सीला १३ आगारांत आणि प्रमुख स्थानकांवर सहकार्य करण्याची पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पीएमपीच्या असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाला पीएमपीच्या संचालक मंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया अल्पावधीत सुरू करण्यात येईल. बस वाहतूक सुरू झाल्यावर कुरिअर आणि मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

शहर, पिंपरी चिंचवपड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकऱणाच्या कार्यक्षेत्रात ही वाहतूक होणार आहे. हा उपक्रम सुरू करण्यासाठी पीएमपीला कोणताही खर्च करण्याची गरज भासणार नाही. उपक्रमातून मिळणारा महसूल पीएमपी आणि एजन्सी यांच्यात विभागला जाईल. त्यासाठी करार करून त्याला संचालक मंडळाची मंजुरी घेण्यात येईल. एसटीने महामंडळाने बसमधून मालवाहतूक सुरू केली आहे, त्या धर्तीवर कुरिअर आणि मालवाहतूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.