'मनसे'च्या रूपाली ठोंबरे-पाटील यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

-मनसे नेत्याच्या स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली
-रूपाली ठोंबरे-पाटील यांनी जम्बो सेंटरबाबत केलेले आंदोलन प्रकरण.

पुणे ः जम्बो रुग्णालयात रुग्णांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत प्रशासकीय कारभाराविरोधात आंदोलन केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा रूपाली ठोंबरे-पाटील यांना अटक करून केलेली स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली आहे.

पाटील यांनी जम्बो सेंटरच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित करीत शनिवारी (ता. 5) आंदोलन केले होते. त्यावेळी त्या मैदानाच्या गेटवर चढून आत गेल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आज त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. ठोंबरे यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. यापुढेही त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्‍यता वाटत असल्याने त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. राणे यांनी पोलिसांची मागणी फेटाळून लावली.

पाटील यांच्याविरुद्ध अशाप्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले असले तरी त्यातील एकाही गुन्हा शारीरिक इजासंदर्भात नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद पाटील यांच्यावतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला.

त्यानंतर यापुढे अशा प्रकारे गुन्हे करणार नाहीत, अशा हमीवर त्यांची न्यायालयाने सुटका केली. पाटील यांच्यावर यापूर्वी खडक, विश्रामबाग, हिंजवडी, बिबवेवाडी, डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court rejected the action taken against Rupali Thombre-Patil