बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्ण वाढताहेत; आता आणखी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

शहरातील तिघांना आज कोरोना झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

बारामती : शहरातील तिघांना आज कोरोना झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. यापैकी एक पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी असून, जळोची येथील कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या प्रौढ व्यक्तीची ती नातेवाईक आहे. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली मात्र बारामतीतील वसंतनगरमध्ये राहणारी एक परिचारिकाही कोरोनाबाधित झाल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले आहे. तर पानगल्लीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसही कोरोनाची लागण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या तीन जणांना कोरोना झाल्यानंतर आता बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 झाली आहे. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. बारामती शहर कोरोनामुक्त झाले होते, मात्र बाहेरगावाहून येणा-यांच्या संसर्गामुळे शहरातही कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वसंतनगरमध्ये वास्तव्य असलेल्या परिचारिकेस कोरोनाची लागण बारामतीत झाली की लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली याचा शोध सुरु झाला आहे. दरम्यान या तिन्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु झाले असून त्यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत. 

अजित पवारांचीही नाराजी...

दरम्यान, बारामती शहर व तालुक्यात अनेक जण मास्कविना फिरताना आपण पाहिले आहेत, लोक सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करत नाहीत, निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोना संपल्यासारखे लोक रस्त्यावर फिरत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र भगत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भल्या पहाटे अजित पवार त्यांच्या घरी पोहोचले होते. त्या वेळी अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. बारामतीतही लोकांनी शिस्त पाळली नाही तर नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही पवार यांनी दिला आहे. 

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID 19 Patients Increasing in Baramati New 3 Patients Found