esakal | बारामती परिसरातील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती परिसरातील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर

येथील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत पुणे जिल्हा परिषद आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड केअर सेंटर उभे करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

बारामती परिसरातील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत पुणे जिल्हा परिषद आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड केअर सेंटर उभे करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. लक्षणे नसलेल्या शंभर कोविड रुग्णांची या ठिकाणी सोय केली जाणार आहे. यामुळे बारामती शहरातील केअर सेंटरवरील ताण कमी होणार असून तालुक्याच्या पश्चिम भागात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येला दिलासा मिळणार आहे.

बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. शहरासोबत ग्रामीण भागातही समान प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने बारामतीच्या पश्चिम भागात कोविड सेंटर व्हावे अशी मागणी होत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासाठी लक्ष घातले. या पार्श्वभूमीवर आज मुरूम येथील अजयश्री कार्यालयात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, राजेंद्र यादव, नीता बारवकर, प्रदीप धापटे, सोमनाथ लांडे, नीता फरांदे, मेनका मगर यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक उपस्थित होते.

या बैठकीत कोविड सेंटरचा निर्णय घेण्यात आला. मान्यवरांनी लगेचच सर्वेक्षण करून सोमेश्वर विद्यालयाची इमारत निश्चित केली. प्रमोद काकडे व डॉ. मनोज खोमणे म्हणाले, जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध करून देईल. औषधोपचाराचीही पूर्ण सोय केली जाईल. विद्यालयाच्या एकेका वर्गात पाच जण अशा शंभर रुग्णांची सोय केली जाईल. केवळ लक्षणे नसलेले रुग्ण येथे ठेवायचे आणि त्रास वाढल्यास ऑक्सिजन रुग्णवाहिकेने ते शिफ्ट करायचे असे नियोजन आहे. पुढील तीन दिवसांत सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच परिसरातील खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करून त्यांचीही या सेंटर साठी मदत घेणार आहोत. अँटीजन चाचण्याची सोयही या ठिकाणी उपलब्ध केली जाईल.

पुरुषोत्तम जगताप म्हणाले, कारखाना सामाजिक बांधिलकी म्हणून इमारत, वीज, पाणी आशा पायाभूत सुविधांसाठी सर्व मदत करणार आहे.

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरही (DCHC) होणार- उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटलमध्ये डीसीएचसी सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  या सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या सुविधा रुग्णांना मिळू शकणार आहेत. फक्त एखादा रुग्ण मयत झाला तर त्याची पुढची सोय कशी करावी या तांत्रिक बाबीची अडचण आहे. ती अडचण सुटली की डिसीएचसी सेंटरही सुरू होईल, अशी माहितीही डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)