esakal | वारज्यात लोकवर्गणीतून कोव्हिड केअर सेंटर होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

warje

वारज्यात लोकवर्गणीतून कोव्हिड केअर सेंटर होणार सुरु

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वारजे माळवाडी- “कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वारजे येथील रुग्ण संख्या ऍक्टिव्ह रुग्ण संख्या हजाराच्या घरात असल्याने गावातील मारुती देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत महापालिकेच्या परवानगीने व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १०९ बेडचे कोव्हीड केअर सेंटर मारुती देवस्थान ट्रस्टच्या राघवदास विद्यालयात तातडीने सुरु होत आहे.” अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्र बराटे यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घरात विलगीकरण करण्यास सांगितले जाते. यावेळी अनेकांना घरात विलगीकरण करण्यासाठी घरात स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अडचण असते. म्हणून कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी युवक कार्यकर्ता भारतभूषण बराटे यांनी पाठपुरावा केला, असे ही शरदचंद्र बराटे यांनी सांगितले.

हेही वाचा: अजित पवारांचे हस्ते वारजे-माळवाडीत कोविड सेंटरचे उद्घाटन

नगरसेवक दिलीप बराटे यांच्या प्रयत्नांतून वारजे परिसरातील गणपती माथा या ठिकाणी महापालिकेच्या वतीने ३२ हजार स्क्वेअर फुट जागेत जनरल आणि मॅटर्निटी होम हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत पालिकेने येथे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या इमारतीमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे शंभर बेडचे कोव्हीड हॉस्पिटल केले जाणार आहे. वैद्यकीय साहित्य व फर्निचर आणि अशी किरकोळ कामे शिल्लक आहे. प्रशासनाने या ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल सुरु होण्यास वेळ लागणार असे सांगितले. तसेच सध्या वारजे परिसरात रुग्ण संख्या जास्त असल्याने आम्ही देवस्थानच्या माध्यमातून कोव्हिड केअर सेंटर सुरु करीत आहे. या सेंटरचा खर्च देवस्थान ट्रस्ट, लोकवर्गणी व दानशूर व्यक्तींच्याकडून करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी लागणारी पूर्वतयारी पूर्ण झाली असून हे सेंटर लवकरच सुरू होणार आहे, असे ही शरदचंद्र बराटे यांनी सांगीतले.