बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीये; आता...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

बारामतीत काल (शनिवार) घेतलेल्या 66 स्वॅबपैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह असून, एक जण पुण्यातील आहे.

बारामती : बारामतीत काल (शनिवार) घेतलेल्या 66 स्वॅबपैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह असून, एक जण पुण्यातील आहे. उर्वरित दोन जण बारामतीतील असून, एक जण पण दरेनजीक भिकोबानगरचा आहे. एक रुग्ण कसब्यातील आहे. बारामतीत नियमित कोरोना रुग्ण सापडत असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आता बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली असून, त्यापैकी 32 रुग्ण बरे झाले. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज नियमितपणे रुग्णांचे स्वॅब घेतले जात असून, रोज नवीन रुग्ण वाढत आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. खाजगी रुग्णालयांसह खाजगी डॉक्टरांच्या सेवाही अधिग्रहीत करण्याच्या स्पष्ट सूचना पवार यांनी प्रशासनास दिल्या आहेत. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे रुपांतर आता कोविड केअर सेंटरमध्ये केले गेले आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे कामकाज आजपासून एमआयडीसीमधील महिला ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणार आहेत. त्यांनाही सात दिवस घरातच विलगीकरणात राहावे लागणार असून, त्याचे हमीपत्रही त्यांना द्यावे लागणार आहे. दोन प्रकारच्या इंजेक्शन्सचा साठा करण्याचेही निर्देश पवार यांनी दिले आहेत.

आरोग्यमंत्र्यांची भेट...

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत केल्या जात असलेल्या तपासणी प्रयोगशाळेस तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे हे या प्रसंगी उपस्थित होते. बारामतीत सुरु असलेल्या कामांबाबत त्यांना माहिती दिली गेली. 

सोलापूर दौ-यात सहभागी...

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार आज सकाळीच सोलापूरकडे बारामतीतून रवाना झाले. त्यांच्या समवेत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आरोग्यमंत्री राजेश टोपे सहभागी झाले असून गोविंदबागेतून काही वेळापूर्वी हे तिघेही सोलापूरच्या दिशेने रवाना झाले. 

(Edited by : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID19 infected patients increasing in Baramati Pune Till now 73 Patients