'भामा आसखेड आंदोलकांवर गुन्हा हा तालुक्यातील काळा दिवस'

रूपेश बुट्टे
Sunday, 6 September 2020

शेतकऱ्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी संतप्त भावना या भागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी करंजविहीरे (ता. खेड) येथे व्यक्त केली.

आंबेठाण : ज्यांच्या त्यागातून भामा-आसखेड धरण उभे राहिले त्या निष्पाप भूमिपुत्र शेतकऱ्यांना जेलमध्ये जावे लागणे ही खेड तालुक्याच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना आहे. शेतकऱ्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी संतप्त भावना या भागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी करंजविहीरे (ता. खेड) येथे व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, ''कोरोना संकटकाळात माझ्या कुटुंबावर आलेला प्रसंग आणि त्यातून आमच्या आईचे झालेले निधन यामुळे मी एक महिना सार्वजनिक जीवनात नव्हतो. त्यामुळे या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही याची आज खंत वाटते.'' 

भामा आसखेड धरणग्रस्तांनी त्याग केला म्हणून आज या धरणाच्या पाण्यावर खालच्या भागातील हजारो लोकांचे प्रपंच फुलले, अनेक शहरे आणि गावे यांना पिण्याचे पाणी मिळते याच पाण्यावर चाकण परिसरातले कारखाने कोट्यावधी रुपये कमावतात मात्र याच धरणग्रस्तांना आपल्या या न्याय्य हक्कासाठी जेलमध्ये जावे लागते हे सर्वच राज्यकर्त्यांचे अपयश आहे. 

जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी लेखी आश्वासन देऊन ते पाळत नाही हे महाराष्ट्रातील प्रशासकिय व्यवस्थेला गालबोट लावणारे आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. करंजविहीरे येथे जिल्हा परिषद निधीतून १२ लक्ष रूपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर,सरपंच उज्वला खेंगले,उपसरपंच कैलास बोऱ्हाडे,माजी सरपंच सयाजी कोळेकर,शांताराम कोळेकर,रमेश कोळेकर, गणपत कोळेकर तसेच सुदाम कोळेकर,रामदास कोळेकर, मल्हारी कलवडे,संतोष कलवडे,सुरेखा बोऱ्हाडे,भाऊसाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against Bhama Askhed protesters is a black day says sharad butte