
हडपसर : वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या सात-आठ जणांवर गुन्हा
हडपसर : वनविभागाच्या जागेत गुरे चारण्यास मनाई केल्याच्या रागातून सात-आठ जणांनी वनरक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ही घटना स.नं.६८ वनविज्ञान केंद्र, हडपसर येथे १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
विशाल यादव (वय ३८, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सात-आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीचे संरक्षण, रोपांचे संरक्षण व संवर्धन, अतिक्रमण होऊ नये ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हडपसर स.नं.६८, वनविज्ञान केंद्रामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना गुरे चारण्यासाठी आरोपी आल्यानंतर त्याला हटकले. त्याचा राग मनामध्ये धरून त्याने साथीदारांना बोलावून अपशब्द वापरीत धक्काबुक्की करून मारहाण केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करीत आहेत.