अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. 

पुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी प्रशासकीय मंडळातील काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजीपाला बाजारात दोन टपऱ्या नव्याने सुरू केल्या गेल्या होत्या. या संदर्भात आडते असोसिएशनने नाराजी व्यक्त केली होती. बाजार समितीच्या प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही हा विषय पुढे आला होता. तेव्हा त्यांनी अनधिकृत टपऱ्या काढून टाका, असे आदेश दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनीही असाच आदेश दिला होता, तरीही कार्यवाही झाली नव्हती. बाजार समितीच्या प्रशासनाने यानंतर भाजीपाला बाजार आणि किराणा भुसार बाजारातील सर्वच टपरीधारकांना नोटीस बजावली. 

पथारी व्यावसायिक पंचायतीने प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलन केले होते. नोटीसची मुदत संपल्यानंतर सोमवारी प्रशासनाने टपऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली. त्या वेळी भाडे देणारे, पाणीपट्टी भरणारे, अनेक वर्षांपासून बाजार आवारात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढल्या जातील, असे नमूद केले. त्यानुसार सोमवारी सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती. 

यापूर्वी बाजार समितीच्या प्रशासनाने १०९ टपरी व्यावसायिकांना पत्रे दिली आहेत. त्यांच्याकडून भाडे वसूल केले जात आहे. अशांपैकी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण दूर करण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे.
- बी. जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime on footpath business