गोदामे हद्दपार?

अनंत काकडे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

चिखली - महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित बैठकीत कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाई झाल्यास विघातक आणि प्रदूषणास हातभार लावणारी भंगार मालाची गोदामे हद्दपार होणार की नाही हा प्रश्‍न प्रलंबितच राहणार, याबाबत नागरिकांत संभ्रमावस्था आहे. 

चिखली - महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित बैठकीत कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाई झाल्यास विघातक आणि प्रदूषणास हातभार लावणारी भंगार मालाची गोदामे हद्दपार होणार की नाही हा प्रश्‍न प्रलंबितच राहणार, याबाबत नागरिकांत संभ्रमावस्था आहे. 

नियम धाब्यावर
कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात चाललेल्या व्यवसायासाठी उद्योगधंदा परवाना, बांधकाम आदी कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकाराला आळा घातला जावा, यासाठी येथील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. याबाबत प्रदूषण महामंडळाने महापालिकेला पत्र पाठवून, प्रदूषणास हातभार लावणाऱ्या अनधिकृत शेडवर कारवाई करावी, त्यांना पाणी तसेच इतर सुविधा पुरविणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

पोलिस बंदोबस्तानंतर कारवाई
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांची बैठक झाली. त्यात अनधिकृत भंगार मालाच्या गोदांमावर कारवाई करण्याचा निर्णय झाला. अनधिकृत गोदाममालकांना पालिकेकडून नोटिसा बजाविण्यात येत आहेत. पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

प्रदूषणासंदर्भात पत्रव्यवहार
प्रदूषण महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले, की कुदळवाडीत अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. अशा अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

काय चालते गोदामात?
 भंगार मालाची वर्गवारी करणे
 विविध प्रकारच्या धातूंची पावडर तयार करणे
 केबल जाळून तांबे वेगळे काढण्याचे उद्योग

कशामुळे होते प्रदूषण?
 ऑइलचे पिंप धुऊन ते दूषित पाणी थेट इंद्रायणीत सोडले जाते
 पाणी तसेच हवेचे उच्चांकी प्रदूषण
 रहिवासी, जलचर प्राण्यांच्या जिवाला धोका

अनधिकृत गोदामे - १,५००
कामगार संख्या - ३०,०००
गोदामांचा परिसर - २५० एकर
वर्षातील आगी - २५ 

कुदळवाडीतील प्रदूषणास हातभार लावणाऱ्या अनधिकृत भंगार व्यवसायावर कारवाई संदर्भात नुकतीच बैठक झाली आहे. त्यानुसार संबंधित विभागांना (बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा) नोटिसा देण्याचे सांगण्यात आले आहे.
- संजय कुलकर्णी, पर्यावरण विभाग, महापालिका

येथील बहुतेक उद्योग अनधिकृत असल्याचे आढळले आहे. परवानगी न घेतलेल्या अनधिकृत भंगार व्यावसायिकांना नोटिसा देण्यात येत आहेत.
- राजेंद्र राणे, उपअभियंता, अतिक्रमण विभाग

लाखो रुपये किमतीची घरे घेतली आहेत. परंतु रात्री या भागात कचऱ्याला आगी लावल्या जातात. त्या आठ-आठ दिवस धुमसत राहतात. धुराच्या प्रदूषणामुळे श्‍वास घेणेही मुश्‍कील होत आहे.
- भाऊसाहेब झिरपे, नागरिक

Web Title: Crime of Godown in Kudalwadi