Crime News : शेतजमिनीच्या वादातुन भावजय व पुतण्यास जाळुन मारण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news attempt to burn brother-in-law and nephew farm land dispute Gram Panchayat member arrested

Crime News : शेतजमिनीच्या वादातुन भावजय व पुतण्यास जाळुन मारण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्याला अटक

वाल्हे : आपल्या शेतात केलेली बेकायदेशीर ऊस लागवड व ऊस तोड करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत सदस्य असलेल्या दिरास ऊसतोडीस विरोध करणाऱ्या भावजय व पुतण्यावर शेतातच अंगावर रॉकेल टाकुन जाळुन मारण्याचा प्रयत्न

करणाऱ्या वागदरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य भास्कर भुजबळ यास काल पोलिसांनी बेड्या ठोकल्या.शारदा भुजबळ यांनी जेजुरी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर रात्री उशीरा पोलिसांनी हि कारवाई केली.

वागदरवाडी(ता.पुंदर) येथील गट क्र.२८५३ मध्ये फिर्यादी शारदा नानासाहेब भुजबळ (सध्या राहणार कात्रज पुणे)यांच्या मालकी हक्काची शेतजमिन आहे. या शेतजमिनीवरुन आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासुन वादविवाद आहेत.

मात्र हे वादविवाद सामपचाराने मिटवण्याएवजी वागदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असलेल्या भास्कर त्रिंबक भुजबळ यांने शारदा भुजबळ यांच्या शेतजमिनीमध्ये दंडेलशाहीने ऊसाची लागवड केली होती.

या क्षेत्रातील ऊसतोड करण्यात येऊ नये यासाठी शारदा भुजबळ यांनी सोमेश्वर कारखान्यास तसे कळविले होते मात्र तरी देखील कारखान्याने या क्षेत्रातील ऊसतोड

करण्यासाठी मजुरांची टोळी पाठवली होती.याबाबतची माहिती शारदा भुजबळ यांना समजल्यानंतर काल शनिवार (दि.७)दुपारी त्यांनी मुलगा स्वप्निल भुजबळ यांच्यासह वागदरवाडी येथे धाव घेत ऊस तोडकामगारांना ऊसाची तोड थांबविण्यास सांगितले.

मात्र राग अनावर झालेल्या भास्कर भुजबळ याने 'अगोदर कर्जाचे पैसे द्या' असे सांगुन शिविगाळ व दमदाटी करत पुर्वनियोजित ठरविल्यासारखे रॉकेलचे कॅन व पेटता टेंभा घेऊन शारदा भुजबळ व स्वप्निल भुजबळ यांच्या अंगावर धावत जाऊन अगोदर शारदा भुजबळ व स्वप्निल भुजबळ

यांच्या अंगावर रॉकेल टाकुन पेटविण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये शारदा भुजबळ यांची साडी काही प्रमाणात पेटली तर मुलगा स्वप्निल याच्या मागे धावत जाऊन त्यालाही पेटविण्याचा भास्कर भुजबळ याने प्रयत्न केला.

यामध्ये त्याच्याही डोक्याच्या मागील बाजुचे काही केस जळुन मानेला व हाताला भाजले आहे.त्यानंतर घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी मध्यस्थी करुन हि आग विझवुन त्यांचा जीव वाचविला.

दरम्यान शारदा भुजबळ व स्वप्निल भुजबळ यांनी घटनेनंतर वाल्हे पोलिस दुरक्षेत्र व जेजुरी पोलिस दुरक्षेत्र या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर जेजुरी पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करत भास्कर भुजबळ याला बेड्या ठोकल्या आहेत.

त्यानुसार भास्कर त्रिंबक भुजबळ (वय ५९) यांच्या विरोधात भा.द.वी. ३०७, ३२४, ५०४, ५०६, कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे हे करीत आहेत.

व्हिडिओने परिसरात खळबळ

काल दुपारी वागदरवाडी येथे हि घटना घडली असताना उपस्थित असलेल्या आरोपीच्या पुतण्याने या भांडणांचा व्हिडिओ काढला होता.एखाद्या चित्रपटाला शोभेल असा सुनियोजीत व चित्तथरारक हल्ल्याचा व्हिडिओ काही काळातच वाल्हे परिसरात व्हायरल झाला.

या हल्ल्याच्या व्हिडिओने परिसरात खळबळ उडाली असुन पोलिसांना देखील आरोपी भास्कर भुजबळ याच्या विरोधात पुरावा म्हणुन हा व्हिडिओ उपयोगी पडला.मात्र आता ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आरोपीच्या सदस्य पदावरुन निलंबनासाठी हा पुरावा कितपत उपयोगी पडेल अशी चर्चा गावात रंगली आहे.