हॉर्न वाजविताना पाहिल्याच्या रागातुन विद्यार्थ्यांना मारहाण; Gpay ने घेतले 50 हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Beating students anger being seen blowing horns took 50 thousand through google pay pune
हॉर्न वाजविताना पाहिल्याच्या रागातुन विद्यार्थ्यांना मारहाण; Gpay ने घेतले 50 हजार

हॉर्न वाजविताना पाहिल्याच्या रागातुन विद्यार्थ्यांना मारहाण; Gpay ने घेतले 50 हजार

पुणे : सिग्नलला थांबल्यानंतर सतत हॉर्न वाजविणाऱ्याकडे पाहिल्याच्या रागातुन टोळक्‍याने चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांचे अपहरण करुन त्यांना रात्रभर मारहाण करीत त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागुन 50 हजार रुपये गुगल पे द्वारे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश दत्तु कांबळे (वय 29, रा.पानेकर मळा, कर्वेनगर), उमेश सुरेश फाटक (वय 19, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर), संतोष प्रकाश ढेबे (वय 23, रा. दांडेकर पुल, दत्तवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्यासह चौघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण, खंडणीप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रोहित वायाळ (वय 21, रा. कर्वेनगर) याने फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व त्याचा मित्र गौरव घायवत असे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरुन त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी जात होते. त्यांची दुचाकी कर्वेनगर येथील स्पेन्सर चौकात आली. त्यावेळी मंगेश कांबळे हा त्याच्या दुचाकीचा हॉर्न सतत वाजवित होता. त्यावेळी फिर्यादीने पाठीमागे वळून पाहिले. त्यानंतर त्यांची दुचाकी पुढे जाऊन थांबली. त्यावेळी कांबळे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडे जाऊन "तुम्ही पाठीमागे वळून का पाहीले, तुम्ही आम्हाला खुन्नस देता का ? अशी धमकी देत दोघांनाही जबर मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी व गौरव तेथून निघून गेले. दरम्यान, त्यांचे मित्र विशाल भारत होनराव व प्रणित चंद्रकुमार जोगी हे दोघेजण तेथे आले.

त्यावेळी आरोपींनी त्यांनाही जबर मारहाण करुन त्यांच्या दुचाकीवर दोघांना बसवून कर्वेनगर पुलाखाली नेऊन तेथे मारहाण केली. तसेच रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून श्रमिक वसाहतीजवळच्या मोकळ्या जागेत नेऊन पुन्हा लोखंडी सळई, बांबु, विटांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना "तुम्हाला कर्वेनगर भागात राहणे मुश्‍किल करु' अशी धमकी देऊन तुम्ही विशाल व प्रणितवर सोन्याची साखळी चोरी केल्याचा आरोप करून त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी 50 हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या गुगल खात्यावर घेतले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दोन लाख रुपये आणण्यास सांगितले. दरम्यान, त्यांच्या बहिणीने तेथे येऊन दोघांची सुटका केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अलंकार पोलिसांनी तीन आरोपींना तत्काळ अटक केली. मंगेश कांबळे हा चालक आहे.

Web Title: Crime News Beating Students Anger Being Seen Blowing Horns Took 50 Thousand Through Google Pay Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top