Social Media Hacking : समाजमाध्यमावरून हॅकिंग वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Hacking increased through social media take precaution police department

Social Media Hacking : समाजमाध्यमावरून हॅकिंग वाढले

पुणे : नामवंत आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या केदारच्या (नाव बदललेले आहे) इन्स्टाग्रामवरील छायाचित्र, व्हिडिओला फॉलोअर्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचे इन्स्टाग्राम खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केले, त्याने पोलिसांकडे तक्रार केली, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा पद्धतीने ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम खाते सायबर गुन्हेगारांकडून हॅक करण्यासह नागरिकांना धमकी देण्यापासून ते खंडणी मागण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. मागील २१ महिन्यांत तब्बल २९९ तक्रारी पोलिसांकडे दाखल आहेत. परंतु, हॅकिंग करणाऱ्या सायबर गुन्हेगारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने त्यांना मोकळे रान मिळाले आहे.

शहरामध्ये ८ ते १० महिन्यांपासून नागरिकांची फेसबुक, इन्स्टाग्राम खाती हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर ई-मेल, डेटा, आयकर खाते, कंपन्यांचे संकेतस्थळ हॅकिंग होण्याच्या घटना घडत आहेत. हा सर्व प्रकार केवळ हॅकिंगपुरता मर्यादित नाही, तर त्याद्वारे नागरिक, कंपन्यांना थेट धमकाविणे, खंडणी मागणे असे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते कलाकार, पत्रकार, नोकरदार, उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचीही समाजमाध्यम खाती हॅक होऊ लागली आहेत. नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्या तरी त्याची कारवाई झाली किंवा नाही, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. हॅकिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

धमकाविणे, खंडणी मागण्याचेही प्रकार २०२१ मध्ये २०, तर यंदा जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ९७ हॅकींगच्या घटना घडल्याची सायबर पोलिसांची आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात किती सायबर गुन्हेगारांवर कारवाई झाली, याची उत्तरे मिळत नसल्याने सायबर गुन्हेगारांकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे.

अशी घ्या काळजी

  • पासवर्ड अवघड व सतत बदलता ठेवा

  • समाज माध्यमांवर वैयक्तिक व गोपनीय माहिती, छायाचित्र, व्हिडिओ टाकू नका

  • आपल्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर चांगल्या कंपनीचा अँटीव्हायरस टाका

  • आपली डिजिटल गोपनीय माहिती अन्य ठिकाणी जतन करून ठेवा

  • ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी व समाजमाध्यमांच्या वापरासाठी स्वतंत्र मोबाईल ठेवा

हॅकिंगच्या घटना ठरतील जीवघेण्या

‘लोन ॲप''द्वारे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे पोलिसांकडून प्रारंभी दुर्लक्ष करण्यात आले. तीन जणांचे बळी गेल्यानंतर अखेर पोलिसांनी ‘लोन ॲप''च्या कॉल सेंटरवर छापे घालून आंतरराष्ट्रीय पातळीवरील रॅकेट उघड केले. त्यामुळे हॅकिंगबाबतही असा प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच पोलिसांची कारवाई होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

समाजमाध्यमांचा वापर व ऑनलाइन व्यवहारांसाठी नागरीकांनी स्वतंत्र मोबाईल वापरावेत. हॅकिंग टाळण्यासाठी युजरनेम, पासवर्ड हे अधिकाधिक मजबूत ठेवावेत. याबरोबरच संबंधित समाज माध्यमांची प्रायव्हसी सेटिंगही वापरली पाहिजे. सरकारनेही सायबर गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले पाहिजेत.

- ॲड. सपना देव, सायबर तज्ज्ञ

माझे फेसबुक खाते २ ऑक्‍टोबर रोजी हॅक झाले. तसेच त्याचे खोटे फेसबुक पेज बनवून त्याद्वारे लोकांशी संपर्क साधला जात होता. मी शेतकऱ्यांसाठी फेसबुक पेजद्वारे व्हिडिओ टाकतो, त्यामुळे मला अधिक काळजी वाटल्याने व काही विचित्र पोस्ट प्रसारित होऊ नयेत, यासाठी मी स्वतः सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

- प्रवीण तरडे, अभिनेता व दिग्दर्शक