
हॉटेल कपिल गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपीसह सात जणांना अटक
नारायणगाव : येथील हॉटेल कपिल बियर बार मध्ये दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुल सारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह सात जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा , नारायणगाव पोलीस व वापी (गुजरात) पोलीस पथकाला यश आले आहे. अटक आरोपी मध्ये चार अल्पवयीन मुले आहेत.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी मनीश उर्फ मन्या विकास पाटे (वय २५ रा.डिंबळेमळा नारायणगाव ता.जुन्नर), आकाश उर्फ बाबु दिलीप कोळी (वय २१), अभिषेक दिलीप कोळी( वय १८, दोघेही राहणार.वारूळवाडी ता.जुन्नर, मुळ चावडीचैक घोडेगाव ,ता.आंबेगाव ) यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.मंगळवारी( ता.१०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मन्या पाटे , गणपत गाडेकर यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथिदार व दुसऱ्या गटातील आकाश उर्फ बाबू कोळी,अभिषेक कोळी यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे अज्ञात साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
घटने नंतर कोळी गटातील आरोपी मुंबई, वापी (गुजरात) येथे फरार झाले होते. या पैकी मुख्य आरोपी अभिषेक कोळी याला वापी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून घटनेत वापरलेले पिस्तुल जप्त केले आहे.इतर आरोपी नारायणगाव व मुंबई येथून ताब्यात घेतले आहेत.पुढील तपास पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: Crime News Hotel Kapil Shooting Case Seven Arrested Including Main Accused Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..