
Crime News : जमिनीच्या वादातून लोहगावमध्ये महिलेस मारहाण
पुणे : जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेट बसविण्याचा प्रयत्न करून जमिनीकडे जाण्यास प्रतिबंध केल्याने झालेल्या वादात भावाने चुलत बहिणीला इतरांच्या मदतीने मारहाण केली. लोहगावमधील महालक्ष्मी लॉन्ससमोरील जागेत सोमवारी (ता. १९) हा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिसांनी प्रीतम प्रतापराव खांदवे, (वय ३९, रा. पाटील वस्ती, लोहगाव), गीता गायकवाड, सीमा हातागळे, सुरेखा गाडगीळ, संगीता गवळे, लक्ष्मी घुले, रुक्मिणी साळवे, जितेंद्र जाधव आणि नूर महम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पार्वती जीवन पाटील (वय ३७, रा. सोमवार पेठ) यांनी या बाबत विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पार्वती पाटील आणि आरोपी प्रीतम खांदवे या हे चुलत भाऊ-बहिण आहेत. महालक्ष्मी लॉन्स आणि परिसरात असलेली जमीन विजयालक्ष्मी खांदवे आणि प्रतापराव खांदवे यांच्या मालकीची आहे. पार्वती पाटील या विजयलक्ष्मी खांदवे यांच्या कन्या असून त्यांच्याकडे वारसा हक्काने ही मालकी आली आहे.
यातील सर्वे नंबर १३२/२ मध्ये प्रीतम खांदवे यांनी गेट बसविण्याचा प्रयत्न केला. तसेच पार्वती पाटील यांना आपल्या मालकीच्या जमिनीकडे जाण्यास प्रतिबंध केला. घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचे पती जमिनीकडे गेले असता प्रीतम खांदवे यांनी काही भाडोत्री महिला आणि पुरुषांना बोलावून पार्वती पाटील यांना बेदम मारहाण केली.
त्यांचे केस ओढून त्यांना खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे पती जीवन पाटील यांनाही शिवीगाळ करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने तपास करीत आहेत. फिर्यादी यांना मारहाण करताना आरोपी महिला.