
अखेर शिक्रापूरकरांचा दुचाकीचोर सापडला ; अक्षय काळे ४० गाड्यांसह जेरबंद
शिक्रापूर : गेल्या वर्षभरापासून शिक्रापूरकरांना दररोज दुचाकी चोरीने हैरान केलेल्या अक्षय काळे या सराईत दुचाकी चोरास याने चोरलेल्या ४० दुचाकींसह जेरबंद करण्याचे अधिका-यांचे आव्हान विकास पाटील व निखील रावडे या दोन कर्मचा-यांनी महिनाभरातच खरे करुन दाखविले. विशेष म्हणजे ४० पैकी ३० गाड्या या एकट्या शिक्रापूरातील असून पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व उपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी संपूर्ण शिक्रापूर पोलिस कर्मचा-यांचे विशेष पत्रकार परिषद घेवून अभिनंदन केले.
गेल्या काही दिवसांपासून शिक्रापूरात दुचाकी चोरीच्या प्रकरणांनी अक्षरश: हैदोस घातला होता. या तक्रारींवरुन शिक्रापूर पोलिसही हैरान होते. याच पार्श्वभूमिवर पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलिस नाईक विकास पाटील व निखील रावडे या दोघांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, विक्रम साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, अविनाश थोरात, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, सागर कोंढाळकर, रोहिदास पारखे, जयराज देवकर, लखन शिरसकर, किशोर शिवणकर आदी सर्वांनाच स्वतंत्र पथके तयार करुन कामाला लावले होते.
दोन दिवसांपूर्वी रावडे व पाटील यांना अक्षय अनिल काळे (वय २३,रा.बजरंगवाडी, शिक्रापूर, ता.शिरुर, मूळ रा.साईनाथ नगर चिंचोडी-पाटील, जि.अहमदनगर) हा शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरुन विकत असल्याची खबर मिळाल्यावरुन वरील सर्वांच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्याला ताब्यात घेताच एकुण ४० दुचाकी त्याचेकडे मिळून आल्या. विशेष म्हणजे ४० पैकी ३० दुचाकी या शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले असून यातील बहुतांश दुचाकी या पुणे व नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
चोरलेल्या दुचाकी थेट मालकांना देण्याचा यशवंत गवारी फंडा...!
चोरलेल्या दुचाकींच्या मालकांनी अशा दुचाकींची मालकी सिध्द करणे आणि ती न्यायालयात सादर करण्याची कायदेशीर प्रक्रीयेला कायद्यानुसारच फाटा देण्याचा अनोखा फंडा नव्यानेच शिरुर उपविभागिय पोलिस अधिकारी म्हणून दाखल झालेले यशवंत गवारी यांनी या प्रकरणात वापरला आहे. न्यायालयीन प्रक्रीयेसाठी मुळ मालकाचा वेळ, पैसा आणि हेलपाटे हे कमी करण्याचा यशवंत गवारींचा फंडा संपूर्ण पुणे शहर, जिल्हा आणि राज्यातील पोलिसांसाठीही पथदर्शी म्हणावा लागेल.
Web Title: Crime News Shikrapurkar Two Wheeler Thief Akshay Kale Arrested With 40 Vehicles Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..