मंचर शहरात दीडशेहून अधिक अतिक्रमणे जमीन दोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime on Encroachment in Manchar

मंचर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या १५० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची कारवाई राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांनी मंगळवारी (ता.२२) केली.

Manchar Encroachment : मंचर शहरात दीडशेहून अधिक अतिक्रमणे जमीन दोस्त

मंचर - मंचर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या १५० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची कारवाई राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांनी मंगळवारी (ता. २२) केली. त्यासाठी चार जेसीबी, दोन ढंपर, पोकलँन व पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. या कारवाईमुळे लहान मोठ्या अनेक व्यावसायिकांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

समाधान हॉटेलपासून जीवन मंगल कार्यालय या दोन किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरील व्यवसायिकांना गुरुवारी (ता. १७) नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार महेश मोरे, अजय घुले, सतीश बेंडे पाटील, प्रशांत बागल,बाळासाहेब थोरात, सखाराम बागल यांच्यासह अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. पण काही जणांना वाटले यापूर्वीही नोटीसा आल्या होत्या. पण कारवाई झाली नव्हती. तसेच अनेक व्यावसायिकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळींची भेट घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. पण मंगळवारी सकाळीच कारवाईला सुरुवात झाल्यानंतर अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (पुणे) सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे, उपअभियंता अनिल गोरड, अरुण चौधरी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस व्हाँन, पोलीस अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईत सहभागी झाला होता. 'झालेल्या कारवाईमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. पण पुन्हा या मार्गावर अतिक्रमणे होऊ नये. यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी वर्गाने सतर्क राहिले पाहिजे.' अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

'मंचर शहरातील रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा ७५ फुट अंतरातील अतिक्रमण विरोधी कारवाई पूर्ण केली आहे. गेल्या आठवड्यात नोटीसा दिल्यानंतर अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले आहे. अनेक पत्र्याचे शेड व पिंपळगाव चौकातील एका इमारतीचा पुढील भाग काढून टाकण्यात आला आहे. गायमुख ते हॉटेल समाधान या मार्गावरील दोन किलोमीटर अंतरातील दुतर्फा अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई बुधवार (ता.२३) पर्यंत पूर्ण होईल.'

- दिलीप शिंदे, सहाय्यक अभियंता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (पुणे)

'गेली दोन वर्ष कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते. काही जणांनी बंद असलेले व्यवसाय दिवाळीतच सुरु केले होते. त्यासाठी बँका व पतसंस्थाकडून अर्थसहाय्य घेतले होते.आत्ता त्यांच्या व्यवसायाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. १५० हून अधिक युवक, युवती व महिलांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.'

- सुहास बाणखेले, हॉटेल व्यावसायिक

टॅग्स :crimemancharEncroached