esakal | ...थांबा, तपास सुरू आहे
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दोन महिने बेदखल 
चिखली, कुदळवाडी येथील डायमंड चौकातील न्यू सागर कम्युनिकेश मोबाईल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल चोरल्याची घटना २६ जूनला उघडकीस आली. याबाबत राहुल गोपीचंद वादवानी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, दोन महिने होत आले तरी या घटनेतील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. फिर्यादी विचारणा करण्यासाठी ठाण्यात गेल्यानंतर तपास सुरू आहे, एवढेच उत्तर ऐकायला मिळते.

...थांबा, तपास सुरू आहे

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी - शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यापासून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात गंभीर गुन्ह्यांसह किरकोळ घटनांचीही नोंद केली होत आहे. मात्र, कागदोपत्री जरी गुन्हा नोंद झाला असला तरी तपासासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काही गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तक्रारदाराला पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत असून, आरोपी मोकाट असल्याची स्थिती शहरामध्ये आहे.

पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार तातडीने गुन्हा दाखल केला जातो. त्यासाठी तपास अधिकाऱ्याचीही नेमणूक केली जाते. मात्र, यामध्ये गंभीर गुन्हा असेल तरच तातडीने दखल घेत आरोपीला ताब्यात घेणे, चौकशी करण्यासह पुढील कारवाई केली जाते. मात्र, किरकोळ गुन्ह्यांमध्ये हवी तेवढी दखल घेतली जात नाही. तक्रारदाराने वारंवार ठाण्यात फेऱ्या मारल्यानंतरही काहीही प्रतिसाद मिळत नाही. केवळ तपास सुरू आहे, इतकेच उत्तर मिळते. दरम्यान, काही घटनांमध्ये तर केवळ गुन्हा दाखल करून घेण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचे दिसून येते. 

मागील वर्षभरात आयुक्‍तालयांतर्गत असलेल्या पंधरा ठाण्यांमध्ये खून, बलात्कार, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, दंगा यासह सर्व प्रकारची चोरी, विश्‍वासघात, फसवणूक, दुखापत, विनयभंग, जुगार यांसारख्या बारा हजार ७२ गुन्ह्यांची तसेच इतर गुन्ह्यांचीही नोंद झाली. यातील गंभीर गुन्ह्यांसाठी तातडीने पथक तयार करून आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीसही आणला. मात्र, गंभीर गुन्ह्यांप्रमाणे पोलिस दफ्तरी दाखल होणाऱ्या इतर गुन्ह्यांचाही तातडीने तपास व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

चोरट्यांची एखादी टोळी पकडल्यानंतर विविध गुन्हे उघडकीस येतात. यामध्ये मोबाईल, दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण अधिक असते. मात्र, इतर वेळी अशाप्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत उदासीनता दाखविली जाते. 

अपुरे मनुष्यबळ
आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. एकाच अधिकारी, कर्मचाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांच्या तपासाचे कामकाज असल्याने तपासासाठी हवा तितका वेळ देणे शक्‍य होत नाही. अशातच विविध बंदोबस्त, न्यायालयाच्या सुनावणीसाठी हजर राहणे, विशेष मोहिमा, गस्त यासाठीही वेळ द्यावा लागत असल्याने गुन्ह्यांचा तपास रखडत आहे.

पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेतला जातो. त्यानंतर दाखल गुन्ह्यांचा तातडीने तपास लावण्याचा प्रयत्न असतो.  
- आर. के. पद्‌मनाभन, पोलिस आयुक्त

loading image
go to top