शिक्षेत अडीच पटींनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अडीच पटींनी वाढले आहे. मागील वर्षभरात शिक्षेची सरासरी ३२ टक्के होती. ती गेल्या सहा महिन्यांत ८७ टक्‍क्‍यांवर पोचली आहे.

पिंपरी - पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अडीच पटींनी वाढले आहे. मागील वर्षभरात शिक्षेची सरासरी ३२ टक्के होती. ती गेल्या सहा महिन्यांत ८७ टक्‍क्‍यांवर पोचली आहे.

स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय स्थापन झाल्यापासून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असतानाच, तपासालाही वेग आला आहे. १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीत २ हजार ३४० प्रकरणांचा निकाल लागला. त्यापैकी २ हजार ३७ प्रकरणांत गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा झाली. उर्वरित ३०३ प्रकरणांमधील आरोपी सुटले. आरोपींना शिक्षा होण्याचे हे प्रमाण ८७ टक्के आहे. 

आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पोलिस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिटची संख्याही पाचवर गेली. सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, खंडणी व दरोडाविरोधी पथक, औद्योगिक असे विविध सेल कार्यरत आहेत. यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब या सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात.गुन्ह्याचा तपास करतानाच ठोस पुरावे जमा करणे, दोषारोपपत्रांची मांडणी, वरिष्ठांकडून कागदपत्रांची तपासणी, तपासासाठी वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या तज्ज्ञांच्या कार्यशाळा याचाही तपासासाठी उपयोग होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या वाढली असून, एखाद्या गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकाधिक वेळ देणे शक्‍य होत आहे; तसेच तपासासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासह दोषारोपपत्र तयार करताना अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

आकडे बोलतात...
  कालावधी : १ जानेवारी ते ३० जून 
  केसचा निकाल : २ हजार ३४०    
  आरोपींना शिक्षा : २ हजार ३७ 
  सुटलेले आरोपी : ३०३ केस 
  शिक्षा होण्याचे प्रमाण : ८७ टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime rate in the police stations has increased in pimpri