कोमेजलेल्या स्वप्नांचाही आता पंचनामा

कोमेजलेल्या स्वप्नांचाही आता पंचनामा
Published on: 

नरेंद्र साठे : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १४ : दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असताना, शेतात उभ्या असलेल्या सर्व पिकांच्या सद्यःस्थितीबरोबरच पुढील काळात होऊ शकणाऱ्या नुकसानीचाही विचार केला जाणार आहे. सध्या ऑक्टोबर हीटमुळे वाढलेले तापमान आणि गाळपाच्या प्रतीक्षेतील ऊस लक्षात घेता, गाळप होईपर्यंत पिकांची स्थिती कायम राहीलच याची खात्री नाही. त्यामुळे भविष्यातील संभाव्य नुकसानही पंचनाम्यांत विचारात घेण्यात येत आहे. तर, जिल्ह्यातील आठ तालुक्यांत आतापर्यंत एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खेड, भोर आणि राजगड या आठ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांकडून शेतनिहाय पाहणी करून नुकसानीची नोंद केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७१ हजार २३५ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख ३९ हजार ७७.१९ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये दोन लाख ३७ हजार ३८२ खातेदारांच्या नुकसानीची नोंद झाली आहे.
सध्या ऑक्टोबर हीटमुळे तापमानात वाढ होत असून, काही भागांत पारा ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत शेतात उभ्या असलेल्या पिकांची स्थिती पुढील काही दिवसांत किंवा महिन्याभरात बदलू शकते. विशेषतः गाळपासाठी उपलब्ध असलेल्या उसाचे गाळप होण्यास १५ दिवसांपासून दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. या काळात वाढत्या तापमानाचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. आज पिकाची स्थिती चांगली असली, तरी गाळपापर्यंत ती तशीच राहील का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे केवळ पंचनाम्याच्या वेळी दिसणाऱ्या स्थितीपुरता विचार न करता भविष्यातील संभाव्य नुकसानीचाही विचार करण्यावर भर दिला जात आहे.


गावांमध्ये जनजागृती
पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नोंद राहून जाऊ नये, यासाठी गावपातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. अनेक शेतकरी वाड्या-वस्त्यांवर राहतात, तर काही जण कामानिमित्त परगावी असतात. त्यामुळे पंचनाम्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी ग्रामपंचायतींच्या सूचनाफलकांवर लेखी सूचना लावण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


दृष्टिक्षेपात
एकूण बाधित क्षेत्र : ३ लाख ७१ हजार २३५ हेक्टर
पूर्ण झालेले पंचनामे : १ लाख ३९ हजार ७७.१९ हेक्टर
पंचनाम्यांत नोंद झालेले खातेदार : २ लाख ३७ हजार ३८२
गावांची संख्या : १,०४२


पंचनाम्यांत कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे पुढील काळात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचनामे योग्य पद्धतीने करावेत. शेतकऱ्यांनी नुकसानीची नोंद करून घेण्यासाठी गावातील तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करता येईल.
- वैभव तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

तालुकानिहाय प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची आकडेवारी
तालुका -- गावे -- क्षेत्र (हेक्टर) -- खातेदार
भोर -- १६७ -- ६,३३६.५९ -- ९,२३८
राजगड -- १२४ -- ३,२५२.०० -- ५,४७६
खेड -- १९३ -- २४,१२०.०० -- ३५,९००
शिरूर-- ८८ -- ३,०२३.६० -- ५,७५९
बारामती -- ११९ -- १५,४५०.०० -- २३,१७५
इंदापूर -- १४१ -- २८,६८६.०० -- ४७,२८०
दौंड -- १०४ -- २२,६३५.०० -- ४०,०२६
पुरंदर -- १०६ -- ३५,५७४.०० -- ७०,५२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com