

एकरी वीस हजार रुपये
नुकसान भरपाई द्या
काढणीपूर्वी पिकांचे पंचनामे करण्याची पाहणी समितीची शिफारस
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पीक नुकसानीच्या पाहणीसाठी स्थापन समितीने व्यक्त केला आहे. यामुळे काढणी सुरू होण्यापूर्वी पिकांचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांचा पिकांसाठी एकरी पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च झाला असून, ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या लहान शेतकऱ्यांना किमान २० हजार रुपये प्रतिएकरी (पाच एकरच्या मर्यादित) मदत द्यावी, अशी शिफारस या समितीने केली आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालावर बुधवारी (ता. १६) मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
पावसाने ओढ दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या अवघा ५१.५१ टक्के पाऊस झाला असून, तब्बल ४८.४९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यातच ‘आयआयटी’ मुंबई आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात ‘पहिली कळ’ (ट्रिगर) लागू झाली असून, खरीप पिकांचे ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी पीक पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाच्या दोन समित्यांसह आयआयटी मुंबईच्या ‘वॉटर बजेट मॉडेल’ने आठही तालुक्यांतील पीक नुकसानीची पाहणी ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान पूर्ण केली. पहिल्या समितीत ‘केव्हीके’ तुळजापूरचे डॉ. एस. एल. सूर्यवंशी (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), प्रा. ए. बी. कसबे (शास्त्रज्ञ, कृषिविद्या), डॉ. एस. एन. झगडे (शास्त्रज्ञ, पीक संरक्षण), डॉ. एन. एस. हरवाडीकर (हवामान तज्ज्ञ), आयआयटी मुंबईचे आकाश राठोड, विशाल इंगोले, आदित्य कडचे, तर दुसऱ्या समितीत प्रा. अरुण गुट्टे (विस्तार कृषी विद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी), डॉ. अनिता साबळे (पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी महाविद्यालय, धाराशिव), आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. हेमंत बेलसरे, डॉ. गोपाल चव्हाण, असीम रमा परवीन यांचा समावेश होता.
समितीच्या अहवालातील वास्तव
- जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचा ८० दिवसांचा खंड.
- पीकवाढीच्या काळात ऑगस्टमध्ये केवळ ४३.१ मिमी (२७.९० टक्के) आणि सप्टेंबरमध्ये अवघा ३.७ टक्के पाऊस.
- सर्व तालुक्यांत पावसाचा खंड ३ ते ४ आठवड्यांपेक्षा जास्त राहिल्याने ‘पहिली कळ’ लागू झाली.
-१५ ऑगस्टनंतर पिकांच्या मूळ क्षेत्रातील उपलब्ध ओलावा २५ टक्क्यांपेक्षा कमी झाला.
-२३ मंडलांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त, २० मंडळांमध्ये ५० ते ६० टक्के, तर दहा मंडलांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.
- पीक कापणीपूर्वीच सर्व पंचनामे करणे आवश्यक.
- फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या शेंगा चपट्या.
- सोयाबीनमध्ये दाणे न भरल्याने शेतकऱ्यांकडून उभ्या पिकांचा चारा म्हणून वापर.
धाराशिव : शेडी (ता. वाशी) येथील भैरू चौगुले यांच्या शेतातील करपलेले सोयाबीनचे पीक. (छायाचित्र : नेताजी नलावडे, वाशी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.