

पीकविमा कंपन्यांनी पंचनामे
करून भरपाई निश्चित करावी
कृषिमंत्री भरणे यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाईची रक्कम निश्चित करावी. अन्यथा, पिकेच शेतात नसतील तर पंचनामे करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे कंपन्यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (ता. ८) केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपन्यांना त्याबाबत निर्देश देणारे पत्र तातडीने दिले जाईल, असे सांगितले.
दरम्यान १३ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. मात्र, सध्या छत्रपती संभाजीनगर, सांगली, नाशिक, लातूर आणि पुणे परिसरातील काही भागात २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड आहे. त्यामुळे तेथे परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती कृषी विभागातर्फे सादरीकरणादरम्यान कृषी सचिव परिमल सिंह यांनी दिली.
राज्यात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे तेथील पिके धोक्यात आहेत. मदतीसाठी शेतकरी मागणी करत असून पीक विम्याबाबत चिंताक्रांत आहे. कंपन्यांचा आजवरचा अनुभव पाहता कंपन्यांचे पीक कापणी प्रयोगाबाबतचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे पीक पक्व होण्याआधीच करपून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे आत्ताच पीक कापणी प्रयोग करावा. काही कंपन्या पीकच शेतात नसल्याचा दावा करत कापणी प्रयोग करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करतात. या कंपन्या दाद देत नाहीत. त्यामुळे त्यांना आताच पत्र लिहून कापणी प्रयोग करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी कृषिमंत्री भरणे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पीकस्थिती आणि विम्याचा आढावा घेतला. त्यानंतर कंपन्यांना तातडीने पत्र लिहून कळविले जाईल, असे सांगितले.
कृषी विभागाच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, २.५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला कालावधी पावसाचा खंड म्हणून ग्राह्य धरला आहे. त्यानुसार अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक ३८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदला आहे. त्याखालोखाल बुलडाणा, नाशिक, सांगली आणि सातारा या चार जिल्ह्यांत ३७ दिवसांचा खंड आहे.
बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांत प्रत्येकी ३४ दिवसांचा, तर परभणी जिल्ह्यात ३० दिवसांचा पावसाचा खंड नोंदला आहे. याशिवाय धुळे, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत २६ दिवसांचा, अकोला आणि वाशीममध्ये २३ दिवसांचा, अमरावतीत २२ दिवसांचा, वर्ध्यात २१ दिवसांचा, तर नागपूरमध्ये २० दिवसांचा खंड नोंदविण्यात आला आहे.
शेतकरी चिंताक्रांत
दीर्घकाळ पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसू शकतो. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर त्याचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस कुठे आणि किती प्रमाणात होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
अकरा जिल्ह्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक खंड
अहिल्यानगर (३८), पुणे (३८), बुलडाणा (३७), नाशिक (३७), सांगली (३७), सातारा (३७), बीड (३४), छत्रपती संभाजीनगर (३४), धाराशिव (३४), सोलापूर (३४), परभणी (३०).
तीन जिल्ह्यांत २५ ते ३० दिवस खंड ः धुळे (२६), जळगाव (२६), जालना (२६).
पाच जिल्ह्यांत २० ते २५ दिवस खंड ः अकोला (२३), वाशीम (२३), अमरावती (२२), वर्धा (२१), नागपूर (२०).
तालुकानिहाय पावसाचा खंड
३८ दिवसांचा खंड असलेले तालुके ः अहिल्यानगर – कर्जत, पुणे – शिरूर.
३७ दिवस ः बुलडाणा – खामगाव, नाशिक – नांदगाव, येवला, पुणे – बारामती, दौंड, पुरंदर, सांगली – आटपाडी, सातारा – फलटण, माण.
३५ दिवस ः अहिल्यानगर – संगमनेर, नाशिक – देवळाली, कळवण.
३४ दिवस ः अहिल्यानगर – शेवगाव, बीड – गेवराई, छत्रपती संभाजीनगर – पैठण, धाराशिव – परांडा, पुणे – इंदापूर, सोलापूर – माळशिरस.
३३ दिवस ः सोलापूर – सांगोला.
३१ दिवस ः सोलापूर – बार्शी, मोहोळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.