

दुष्काळात फळबागा विम्याच्या कवचाबाहेर
सुमारे तीन लाख हेक्टरवर फळबागा; अपुरी नोंदणी, आंबा, डाळिंबासाठी अद्याप संधी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ ः जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटात फळबागांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीकविमा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. मात्र, प्रधानमंत्री पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेइतका मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांचे क्षेत्र आहे. मात्र, १८ नोव्हेंबरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून आतापर्यंत केवळ ३ हजार ५३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, २ हजार ९१४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
जिल्ह्यात जवळपास आठ हजार हेक्टरवर केळीची लागवड आहे. मात्र, ९ नोव्हेंबरच्या पीकनिहाय अहवालानुसार केळीचे अवघे १ हजार ७६५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. म्हणजेच प्रत्यक्ष लागवडीच्या तुलनेत मोठे क्षेत्र विम्याच्या संरक्षणाबाहेर आहे. जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. मात्र, या पिकाच्या विमा नोंदणीतही अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. ९ नोव्हेंबरच्या अहवालात द्राक्षाचे विमा संरक्षित क्षेत्र सुमारे ६२५ हेक्टर होते.
केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अधिक असली तरी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षण कमी आहे. द्राक्ष उत्पादकांचीही अशीच स्थिती आहे. याशिवाय आंबा, डाळिंब उत्पादकांसाठी विमा नोंदणीची मुदत अद्याप शिल्लक आहे. आंब्यासाठी ३१ डिसेंबर, तर डाळिंबासाठी १४ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता, तापमानातील बदल आणि प्रतिकूल हवामानामुळे फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी केवळ केळी-द्राक्षच नव्हे, तर आंबा आणि डाळिंब उत्पादकांनीही योजनेचा लाभ घेऊन आपल्या फळबागा विमा संरक्षित करणे आवश्यक आहे.
चौकट
यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
दुष्काळात फळबागांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीत विमा नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, पीकविमा नोंदणी करूनही न मिळणाऱ्या लाभाचा अनुभव, सर्व्हर डाऊनसह सेवा केंद्रांवर येणाऱ्या अडचणी आणि बंधनकारक केलेले ''थंबिंग'' यामुळे शेतकरी पीकविमा नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आहे.
फळ पीकविम्यावर एक नजर
- कर्जदार ७३
- बिगर कर्जदार ३,४६५
- एकूण ३,५३८
- संरक्षित क्षेत्र २,९१४.३९ हेक्टर
- एकूण विमा हप्ता १४०,४२१,८३१ रूपये
- विमा संरक्षित रक्कम ६२२,३४९,३६१ रूपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.