agn Coop Croplaon Kharif 26 24102026_txt.txt

agn Coop Croplaon Kharif 26 24102026_txt.txt
Published on: 

उद्दिष्टानंतर खरिपात
११ हजार कोटींचे कमी पीककर्ज

वितरणात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची कामगिरी निराशाजनक

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : खरिपात शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करण्याबाबत राज्य सरकारने वारंवार सूचना दिल्यानंतरही खासगी, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवितरणात आखडता हात घेतला. मागणी असूनही शेतकऱ्यांना साडेअकरा हजार कोटी रुपयांचे कमी कर्जवाटप केले, असे आता स्पष्ट झाले आहे.
एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकाने सांगितले, की खरीप कर्जवितरणात सर्व बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कामगिरी उत्तम ठरली. राज्यातील २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २० हजार २३६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना होती. ३० सप्टेंबरअखेर जिल्हा बँकांनी २२ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना १९ हजार ८९१ कोटी रुपयांचे वितरण केले. कर्जवाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या ९८ टक्क्यांपर्यंत होते. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी फक्त ७५ टक्के कर्जवाटप केले. राष्ट्रीयीकृत बँकांवर १७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना २२ हजार ५८० कोटी रुपयांचे कर्ज खरिपासाठी द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु या बँकांनी केवळ ८ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना १६ हजार ९७० कोटी रुपयांचे कर्ज दिले.
राज्यातील खासगी बँकांनी कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षाही टुकार कामगिरी केली आहे. खासगी बँकांकडे पीककर्जासाठी तरतूद असूनही त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ दिल्या नाहीत. राज्यातील ४ लाख १७ हजार शेतकऱ्यांना खासगी बँकांनी ६ हजार २२४ कोटी रुपयांचे पीककर्ज द्यावे, असे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. परंतु खासगी बँकांनी केवळ ७८ हजार शेतकऱ्यांना कर्ज दिले. कर्जाची रक्कमदेखील कमी म्हणजे दोन हजार २८८ कोटी रुपयांच्या आसपास होती. ग्रामीण बँकांची कामगिरीदेखील उदासीन होती. ग्रामीण बँकांनी एक लाख ८४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार १३६ कोटी रुपयांचे कर्ज वाटले. प्रत्यक्षात तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांना तीन हजार ८१६ कोटी रुपयांचे कर्ज वाटण्याची जबाबदारी ग्रामीण बँकांवर होती.


उद्दिष्टापेक्षाही २२ टक्के कमी
खरिपात ४५ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ५२ हजार ८५६ कोटी रुपयांचे पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे उद्दिष्ट सर्व बँकांचे उच्चपदस्थ अधिकारी व राज्य सरकारच्या एकत्रित बैठकीत ठरवले होते. प्रत्यक्षात फक्त ३४ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले. कर्जाची रक्कम ४१ हजार २८५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. बँकांनी उद्दिष्टापेक्षाही २२ टक्के कर्ज कमी वाटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com