वळती घाटमाथ्यावर पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस; पिके गेली वाहून

जनार्दन दांडगे
Wednesday, 21 October 2020

वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले असले तरी, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील घरे व दुकानांच्या नुकसानीस मानवनिर्मित असल्याचे दिसून येत आहे. वळती येथून शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरलेल्या ओढ्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रविवारी (ता. १८) वळतीहून आलेल्या पाण्यामुळे ओढ्याच्या लगत हाहाकार माजवल्याचे दिसून आले आहे

उरुळी कांचन (पुणे) - वळती (ता.हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकरावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती हद्दीत पडलेल्या पावसाचे पाणी उरुळी कांचन गावात शिरले. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत शंभरहून अधिक घरात पाणी पाणी झाले होते. यात पन्नासहून अधिक दुकानांचे नुकसान झाले आहे. 

वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले असले तरी, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील घरे व दुकानांच्या नुकसानीस मानवनिर्मित असल्याचे दिसून येत आहे. वळती येथून शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरलेल्या ओढ्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रविवारी (ता. १८) वळतीहून आलेल्या पाण्यामुळे ओढ्याच्या लगत हाहाकार माजवल्याचे दिसून आले आहे. डाळींब व शिंदवने गावातून आलेल्या व उरुळी कांचन शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या दोन्ही ओढ्यांची अवस्था छोट्या गटाराहून अधिक वाईट असल्याचे दिसून येत आहे.   

जेजुरी बाजूकडून वळती गावाच्या हद्दीतील बंगोली, गडद, वाघदरा व मोरदरा या घाटमाथ्यावरील पाच ठिकाणी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला. या परिसरात शेतीसाठी उभारण्यात आलेले छोटे चार तलाव फुटल्याने, बंगोली, गडद, वाघदरा व मोरदरा या परिसरात पाणीच पाणी झाले. यामुळे वरील भागातील बाराशेहून अधिक एकरावरील पिके वाहून गेली. तर काही पाणी मोठ्या साचल्याने, पिके नासली. बंगोली, गडद, वाघदरा व मोरदरा या परिसरात पाऊस झाला असला तरी, वळती गावच्या हद्दीतील म्हैसखिंड व पिंपळदरा या परिसरात पाऊस नसल्याने वळतीवरील मोठे संकट ठळले. म्हैसखिंड व पिंपळदरा या भागात मुसळधार पाऊस झाला असता, वळती गावासह आणखी हजारो एकरावरील पिके वाहून गेली असती, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पावसाचे पाणी ओढ्यात बसत नसल्याने, उरुळी कांचन शहर जलमय, ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचा मोठा फटका... 
वळती व डाळींब (ता. दौंड) या दोन गावाच्या हद्दीतील डोंगरात उगम पावणारे दोन ओढे उरुळी कांचन शहरात एकत्र होऊन, दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात. डाळींब परिसरातून आलेला ओढा पांढरस्थळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाच्या खालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. तर वळतीहून निघालेला ओढा शिंदवने मार्गे जेजुरी रस्त्याजवळून व पुणे-सोलापुर महामार्गाखालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. सायरस पुनावाला शाळेजळ दोन्ही ओढे एक होऊन, रेल्वेखालील मोऱ्यातून दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात. दरम्यान वरील दोन्ही ओढ्यावर, ओढ्यालगतच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत. पंचवीस वर्षापूर्वी शंभर फुटाहून अधिक रुंदी असलेले ओढे, सध्या दहा फूटीचे रुंदीचेही उरलेले नाहीत. ओढ्यालगत अनेक व्यावसायिकांनी दुकान, टपऱ्या टाकून अतिक्रमण करुन पुर्णपणे वेढले आहे. यामुळे वळती व डाळींब भागातील घाटमाथ्यावर थोडाफार पाऊस झाला तरी, उरुळी कांचन शहरातील रस्ते व दुकाने पाण्याखाली हे समीकरण ठरलेले आहे. रविवारीही पावसाचे पाणी ओढ्यात मावत नसल्यानेच, पाणी इंदिरानगर, उरुळी कांचन शहरातील बाजारपेठ, बाजारमैदानात शिरल्याने हाहाकार उडाला होता. वळती परिसरातील पाऊस संपून, पंधरा तासाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही उरुळी कांचन शहरातील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत होते. वळती येथुन आलेल्या ओढ्यातले पाणी रेल्वेखालील नऊ मोऱ्यात बसत नसल्याने, गावात पाण्याचा फुगवटा आल्याचे दिसून येत आहे. 

उरुळी कांचन जलमय होण्याची प्रमुख कारणे...
-वळती व डाळींब (ता. दौंड) गावातुन येणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणे. 
-शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांची रुंदी शंभर, सव्वाशे फुटावरुन दहा ते पंधरा फुटावर येणे. 
-ओढ्यात कचरा टाकणे, 
-ओढ्यात बाधकामाचा राडारोडा टाकणे
-ओढ्यावर बांधलेल्या पुलांची उंची पुरेशी नसणे, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणे.
-पावसाळ्यापुर्वी ओढ्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ. 
-ओढ्यात वाळू धुण्यासाठी वॉशिंग सेंटर उभी राहिल्याने, वाळुमधील गाळ ओढ्यात येऊन, ओढे पॅक होणे. 

उपाय योजना.
-वळती व डाळींब (ता. दौंड) गावातून येणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणे त्वरीत हटविण्याची गरज
-शहरातून वाहणाऱ्या दोन्ही ओढ्यांची रुंदी पुर्ववत करणे, पक्की बांधकामे व टपऱ्या हटविणे.
-ओढ्यात बांधकामाचा राडारोडा टाकण्यास मनाई करणे व ओढ्यात टाकलेला राडारोडा हटविणे. 
-ओढ्यावर बांधलेल्या पुलांची उंची वाढवणे.
-पावसाळ्यापूर्वी ओढ्यातील कचरा काढणे व ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह चालू करणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops destroyed due to cloudburst rain on the walati village