esakal | कोरोनावरील औषधांसाठी कटिबद्ध;"सीएसआयआर'च्या शास्त्रज्ञांचा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनावरील औषधांसाठी कटिबद्ध;"सीएसआयआर'च्या शास्त्रज्ञांचा विश्वास

देशातील नागरिकांना किफायतशीर किमतीत उपलब्ध व्हावी,यासाठी आवश्‍यक ते सर्व संशोधन साह्य,रसायने आणि प्रामाणिकीकरण सुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,असा विश्वास सीएसआयआर शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे

कोरोनावरील औषधांसाठी कटिबद्ध;"सीएसआयआर'च्या शास्त्रज्ञांचा विश्वास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोविड-19 संबंधीची चाचणी पद्धत, वैद्यकीय उपकरणांचे तंत्रज्ञान, उपचार पद्धती आणि औषधे देशातील नागरिकांना किफायतशीर किमतीत उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्‍यक ते सर्व संशोधन साह्य, रसायने आणि प्रामाणिकीकरण सुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"सीएसआयआर' ही देशातील सर्वांत मोठी वैज्ञानिक संशोधन संस्था असून, तब्बल 39 प्रयोगशाळांमधून तिचे संचालन होते. कोरोनाविरुद्धचे आजपर्यंतचे बहुतेक वैज्ञानिक संशोधन आणि साह्य "सीएसआयआर'च्या माध्यमातून पुरविले जात आहे. यासाठी "सीएसआयआर'च्यावतीने टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे आणि डॉ. राम विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चमूने आजपर्यंतच्या कामाची माहिती शनिवारी फेसबुकच्या माध्यमातून दिली. कोरोना बाधिताच्या चाचणीपासून ते उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधने आणि औषधांसंबंधीच्या संशोधनाची माहिती त्यांनी दिली. तसेच, औषध उपलब्ध झाल्यास, त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच टास्क फोर्स 
1) देखरेख 

- कोविड-19 च्या प्रसाराची पद्धत, वेग आणि त्यासंबंधीचे संशोधन 
- भारतीयांमध्ये दिसणारी लक्षणे, कोविड-19 विषाणूचे वैज्ञानिक संस्करण, संशोधनासाठी आवश्‍यक माहितीचे विश्‍लेषण 
- पुढील प्रसाराची दिशा, विषाणूमध्ये म्यूटेशन आदींवर लक्ष ठेवणे 

2) टेस्टिंग किट 
- कोविड-19 चे निदान प्रयोगशाळांमध्ये करणे 
- जलद निदानासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान आणि किटची निर्मिती 
- उपलब्ध किटचा दर्जा तपासणे आणि प्रामाणिकीकरण करणे 
- रॅपिड पेपर किटची निर्मिती 

3) सुरक्षा साहित्याची निर्मिती 
- मास्क, पीपीई कीट या संबंधीचे संशोधन 
- जलदगतीने व्हेंटिलेटर उपलब्ध होण्यासाठी संशोधन 

4) उपचार पद्धती आणि औषधे 
- कोविड-19 च्या उपचारासाठी आवश्‍यक औषधांवर संशोधन 
- आवश्‍यक रसायने आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करणे 
- कोविड-19च्या विषाणूचे जीनोम सिक्वेंसींग करणे 
- महत्त्वपूर्ण रसायनांची आणि औषधांची देशातच निर्मिती 
- क्‍लिनिकल ट्रायल पूर्ण करणे 

5) पुरवठा समन्वय 
- वैद्यकीय उपकरणांचे देशातील सर्व वैद्यकीय आस्थापनांना पुरवठा करणे 
- मास्क, पीपीई कीट, व्हेंटिलेटर, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे औषधे यांचा पुरवठा 

"रेमडेसिव्हिर'ची देशात होणार निर्मिती 
कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी उपयोगी औषधांचे शोध घेण्याचे काम "सीएसआयआर'च्या प्रयोगशाळा घेत आहे. त्यासाठी 25 प्रकारची औषधे निश्‍चित करण्यात आली असून, त्यावर संशोधनही चालू आहे. आजपर्यंतच्या संशोधनानुसार रेमडेसिव्हियर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. देशातही रेमडेसिव्हर औषध विकसित करण्यासाठी आवश्‍यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजीचे संचालक डॉ. चंद्रशेखर एस. यांनी दिली. 

एन-95 मास्कचा पुनर्वापर 
एन-95 मास्कची आवश्‍यकता बघता, त्याच्या पुर्नवापरासंबंधीचे संशोधन करण्यात येत आहे. अतिनील किरणांचा किंवा रसायनांच्या वापरासंबंधीचे संशोधन चालू आहे. "एन-95' चे निर्जंतुकीकरण करणे शक्‍य झाले तरी त्याच व्यक्तीचा मास्क तिनेच वापरणे योग्य राहील. त्याचप्रमाणे एन-95 मास्क बनवितानाच्या मापदंडांमध्येही बदल करावा लागेल. इतरही मास्कच्या निर्मितीसंदर्भात संशोधन आणि वैद्यकीय चाचण्या चालू आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र जाधव यांनी दिली. 

वैज्ञानिक म्हणाले.. 
- रॅपिड टेस्टिंग पेपर कीट लवकरच बाजारात येणार 
- औषधांसाठी आवश्‍यक कच्चा माल देशात तयार करणार 
- सीएसआयआरच्या 15 प्रयोगशाळांमध्ये कोविड चाचणी 
- प्लाझ्मा थेरपीसाठी आवश्‍यक संशोधन सहकार्य उपलब्ध करणार 
- औषध निर्मितीसाठी स्टार्टअप, उद्योग यांचा सहभाग आवश्‍यक