Ashadhi Wari 2024 : अहिंसा तत्त्वाची वारीत जोपासना

अहिंसा हे महत्त्वाचे मानवी जीवनमूल्य आहे. अहिंसेचा विचार भिन्न स्वरूपाचे व वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या शास्त्रकारांनी केला आहे. अहिंसा ही शारीरिक, वाचिक आणि मानसिक स्तरावर असते. मनाने, वाचेने व शरीराने कोणत्याही प्राण्यास पीडा पोचेल, असे कर्म न करणे यास अहिंसा म्हटले जाते.
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024sakal
Updated on

जीवनमूल्ये

डॉ. यशोधन महाराज साखरे

अहिंसा हे महत्त्वाचे मानवी जीवनमूल्य आहे. अहिंसेचा विचार भिन्न स्वरूपाचे व वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या शास्त्रकारांनी केला आहे. अहिंसा ही शारीरिक, वाचिक आणि मानसिक स्तरावर असते. मनाने, वाचेने व शरीराने कोणत्याही प्राण्यास पीडा पोचेल, असे कर्म न करणे यास अहिंसा म्हटले जाते. श्रीमत् शंकराचार्य अहिंसेची व्याख्या ‘अहिंसनं प्राणिनां पीडावर्जनम्।’ अशी करतात. अर्थात परपीडा वर्जित करणे म्हणजेच अहिंसा होय. प्राण्यांना पीडा होऊ नये म्हणून अहिंसा व्रत संपन्न महात्मा कसा वागतो? कसा बोलतो? याचे वर्णन श्री ज्ञानराज माऊली अत्यंत विहंगम रीतीने करतात, ‘कां कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार। कुचुंबैल केसर। इया शंका॥ तैसे परमाणु पां गुंतले। जाणूनि जीव सानुले। कारुण्यामाजीं पाउलें। लपवूनि चाले।।...’ कमळातील केसर तंतू चुरगाळतील या विचाराने भ्रमर कमळावर हळुवार जपून पाय ठेवतात, त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत, असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो. तो बोलतो कसा? याविषयी श्री ज्ञानेश्‍वर महाराज सांगतात, ‘पुढां स्नेह पाझरे। माघां चालती अक्षरें। शब्द पाठीं अवतरे। कृपा आधीं॥...’ तो कोणाशी बोलत असता मुखातून अक्षरे बाहेर पडण्याआधीच पुढे स्नेहभाव पाझरत असल्याचे दृष्टीस पडते.

चित्तात आधी दयाभाव प्रकट होते व मग कृपाविष्ट शब्द प्रकट होतात. फक्त बाह्य स्वरुपावरून एखादी गोष्ट हिंसात्मक आहे अथवा अहिंसात्मक आहे हे ठरवता येत नाही. मुलाच्या कल्याणासाठी माता जेव्हा मुलाला रागवते, तेव्हा ती क्रिया हिंसात्मक वाटते, पण ती हिंसात्मक नसते. जेव्हा एखादा शल्यविशारद रुग्णाची शस्त्रक्रिया करतो, तेव्हा ती वरपांग हिंसात्मक क्रिया वाटत असली तरी ती हिंसा घडत नाही. तर कधी कधी बाह्यदृष्टीने क्रिया अहिंसात्मक वाटली तरी अंतरंगाने, सूक्ष्मतेने विचार केल्यावर त्यामागील हिंसा लक्षात येते. यास्तव हिंसा-अहिंसा या मधील विवेक शास्त्रशुद्ध रीतीने व बारकाव्याने करणे आवश्यक आहे.

अहिंसा या संकल्पनेचा विचार शब्दशास्त्रानुसार केल्यास, ‘अ’ म्हणजे नाही. म्हणजेच हिंसेचा अभाव अथवा अहिंसा म्हणजे हिंसेच्या विरुद्ध असा अर्थ होतो. हा हिंसेचा अर्थ अभावात्मक अथवा नकारात्मक स्वरूपाचा आहे. याच दृष्टीने अहिंसा या संकल्पनेचा सर्व शास्त्रकारांनी विचार हा हिंसेच्या सापेक्षतेने केला आहे. श्री ज्ञानेश्‍वर महाराज मात्र अहिंसा या संकल्पनेचा विचार सकारात्मक रीतीने करतात आणि, ‘जगाचिया सुखोद्देशें। शरीरवाचामानसें। राहाटणें तें अहिंसे। रूप जाण॥...’ काया, वाचा, मनाने जगाला सुख व्हावे याच एकमेव हेतूने, उद्देशाने शारीरिक, वाचिक व मानसिक क्रिया करणे हीच अहिंसा आहे. वारीत चालताना वारकरी कोणत्याही प्रकाराने आपल्याकडून कोणतीही आणि कोणालाही त्रास अथवा पीडा होऊ नये याची काळजी घेतो. किंबहुना कोणालाही संबोधताना ‘माऊली’ हेच संबोधन वापरतो. अशा स्वरूपाच्या आचरणाने वारीमध्ये अहिंसा या मानवी जीवनमूल्याचे सहजगत्या अनुष्ठान केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.