Cyber Crime : सायबर गुन्हेगारांपासून सावधान! पुण्यात फसवणुकीच्या घटनांत वाढ

सायबर गुन्हेगारांकडून समोरील व्यक्तीला एअरटेल, जिओ किंवा इतर कंपनीचे बनावट मेसेज पाठवले जातात. पैशांची मागणी करताना क्यूआर कोड किंवा लिंक पाठवली जाते.
Cyber Crime
Cyber CrimeSakal
Summary

सायबर गुन्हेगारांकडून समोरील व्यक्तीला एअरटेल, जिओ किंवा इतर कंपनीचे बनावट मेसेज पाठवले जातात. पैशांची मागणी करताना क्यूआर कोड किंवा लिंक पाठवली जाते.

पुणे - बिबवेवाडीत आठ दिवसांपूर्वी घडलेली घटना...सुनील देशमुख (नाव बदलले आहे) यांनी ‘ओएलएक्स’वर गाडी विकण्यासाठी गाडीचा फोटो, माहिती आणि अपेक्षित किंमत टाकली. त्यावर एका व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. ‘मला तुमची गाडी आवडली आहे. त्यासाठी मी एक हजार रुपये टोकन पाठवतो,’ असे सांगितले. त्यावर सुनील म्हणाले, ‘टोकन नको, तुम्ही अगोदर प्रत्यक्ष गाडी बघा,’ परंतु समोरील व्यक्तीने ‘तुम्ही दुसऱ्याला गाडी विकू नये, यासाठी टोकन घ्याच’ असा आग्रह धरला.

त्याला होकार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीने ‘पैसे पाठवतो, परंतु तुमचे गुगल पे अकाउंट दिसत नाही. तुम्ही मला गुगल पेवर एक रुपया पाठवा, तुम्हाला मी टोकनची रक्कम पाठवतो, असे सांगितले. सुनील यांनी त्या व्यक्तीला एक रुपया गुगल पे करताच काही मिनिटांतच सुनील यांच्या अकाउंटमधून परस्पर ५७ हजार रुपये काढून घेण्यात आले. अन्य एका व्यक्तीची अशाच प्रकारे एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सध्या हा ऑनलाइन फसवणुकीचा ‘ट्रेंड’ सुरू आहे.

कशी होते फसवणूक?

सायबर गुन्हेगारांकडून समोरील व्यक्तीला एअरटेल, जिओ किंवा इतर कंपनीचे बनावट मेसेज पाठवले जातात. पैशांची मागणी करताना क्यूआर कोड किंवा लिंक पाठवली जाते. ही लिंक डाउनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा ‘रिमोट ॲक्सेस’ सायबर गुन्हेगाराला मिळतो. त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार हे आपला संपूर्ण डेटा मिळवतात. त्यानंतर ओटीपी किंवा मेसेज डायव्हर्ट केले जातात आणि परस्पर खात्यातून रक्कम काढून घेतली जाते. ऑनलाइन शॉपिंग, केवायसी अपडेट करणे, एमएसईबीच बिल भरण्यासाठी लिंक पाठविणे, सुंदर मुलींचे फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकदा वैयक्तिक, उद्योजक, बॅंका, संस्था यांची माहिती चोरी करून ती ‘डार्कवेब’ नेटवर्कवर विकली जाते.

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार

  • एमएसईबीचे वीजबिल थकले आहे, तुम्हाला पाठविलेल्या लिंकवर बिलाची रक्कम भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करू, असा मेसेज पाठविला जातो. त्यावर क्लिक केल्यास काही वेळात तुमच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतली जाते.

  • फेसबुक, इन्स्टाग्रामवर तरुणींचे फोटो, अश्लील व्हिडिओ पाठवले जातात. त्यांच्यासोबत चॅटिंग सुरू केल्यास तरुणी न्यूड होते, शिवाय तुम्हालाही न्यूड होण्यास सांगते. त्यानंतर ते व्हिडिओ फेसबुक किंवा यूट्यूबवर अपलोड करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात.

  • लोन ॲपद्वारे केवायसी न पाहता चार ते पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. कर्ज घेताना आपण त्यांच्या ॲपवर ॲग्री केल्यानंतर आपला डेटा, मोबाईल लिस्टमधील फोन क्रमांक घेतला जातो. लोन घेतल्यानंतर चार दिवसांत ते परत न केल्यास आपले मॉर्फ छेडछाड केलेले फोटो मित्र आणि नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात.

२०२२ मधील फसवणुकीचे प्रकार

  • लोन ॲप फ्रॉड - ३४७३

  • क्रिप्टो करन्सी - १५४

  • जॉब फ्रॉड - ७९७

  • ऑनलाइन खरेदी - २५५५

  • फेसबुक, इन्स्टाग्राम - ३०५८

  • न्यूड व्हिडिओ कॉल - १४५८

  • ओएलएक्स फ्रॉड - ७१७

  • फेसबुक, ट्विटर हॅकिंग - ६३०

  • शेअर मार्केट - १४४

क्यूआर कोड आणि सर्व बाबींची शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने बॅंकेशी संपर्क साधून खाते तात्पुरते बंद करावे, तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. आयटी कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित बॅंकेकडून फ्रॉडरिस्क मॅनेजमेंट टूल, सायबर फ्रॉड इन्शुरन्स आणि कस्टमर ग्रिव्हियन्स मेकॅनिझमच्या मदतीद्वारे आपली रक्कम ४८ तासांत परत मिळवणे शक्य आहे.

- ॲड. जयश्री नांगरे, सायबर लॉ तज्ज्ञ आणि महा-आयटी सल्लागार

‘महावितरण’चे कर्मचारी हे ऑनलाइन वीजपुरवठा खंडित करीत नाहीत. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी घरी जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी परस्पर अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये. फेसबुक किंवा यूट्यूब अशा सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड केला जात नाही. फसवणूक झाल्यास सायबर पोलिस ठाण्यात किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

- मीनल सुपे पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

ऑनलाइन फसवणूक...

वर्ष २०२२ मध्ये दाखल अर्ज - २४ हजार

वर्ष २०२१ दाखल अर्ज - १९ हजार २३

पोलिसांनी २०२२ मध्ये परत मिळवून दिलेली रक्कम - ६ कोटी ६० लाख रुपये

हेल्पलाइन क्रमांक - १९३०

सायबर पोलिस ठाणे क्रमांक - ७०५८७१९३७१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com