#CyberCrime सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना लाखोंचा गंडा

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

अशी घ्या काळजी 

  • कंपन्यांचे वेबसाइट, गुगल पेज अधिकृत असल्याची खात्री करा
  • अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठलेही ॲप डाऊनलोड करू नका
  • कोणत्याही लिंकवर बॅंकेची गोपनीय माहिती भरू नका
  • अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाइन व्यवहार करू नका
  • परराज्यांतील फोन नंबर, मोबाईल क्रमांकाला प्रतिसाद देऊ नका 
  • प्रत्यक्षात भेटूनच आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य द्या

पुणे - वेगवेगळ्या कंपन्या, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, आरटीओ, कार्यालये, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्री दुकानांच्या बनावट वेबसाइट तयार करून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. या स्वरूपाचे २० ते २५ हून अधिक सायबर गुन्हे घडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्राहकाने बाफना मोटर्स कंपनीतून गाडी खरेदी केली. त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याने ‘गुगल’ या सर्च इंजिनवर संबंधित कंपनीची वेबसाइट शोधून त्यावर संपर्क साधला. त्या वेळी समोरील व्यक्तीने ग्राहकाला सर्व्हिसिंगसाठी एका ॲपद्वारे दहा रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार ग्राहकाने ऑनलाइन पैसे भरले. त्यानंतर काही मिनिटांतच ग्राहकाच्या बॅंक खात्यातील ३५ हजार रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी कंपनीने सायबर पोलिस व गुगलकडे तक्रार केली आहे, असे मार्केटिंग व्यवस्थापक राहुल काळे यांनी सांगितले.

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक

कंपन्या, शैक्षणिक संस्था, शोरूम, हॉटेल्स, मद्यविक्रीची, स्पोर्टस्‌ची दुकाने यांच्याकडून ग्राहकांच्या सेवेसाठी वेबसाइट किंवा ‘गुगल पेज’ तयार केले जाते. त्याद्वारे ग्राहकांना माहिती देण्याबरोबरच त्यांच्याकडून प्रतिसादही घेतला जातो. त्यासाठी संबंधित कंपन्यांचे मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक त्यावर दिले जातात. उच्चशिक्षित ग्राहक या वेबसाइटचा सर्रास वापर करतात.

दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे

दरम्यान, सायबर गुन्हेगार संबंधित कंपन्यांची बनावट वेबसाइट, गुगल पेज तयार करून किंवा त्याच्याशी छेडछाड करून त्यावर स्वतःचे मोबाईल क्रमांक टाकतात. त्याद्वारे संबंधित कंपन्यांच्या ग्राहकांना जाळ्यात ओढून ॲप डाऊनलोड करण्यास, लिंक पाठवून पैसे भरण्यास किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास भाग पाडतात.

ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातील हजारो रुपये काढून घेतले जातात. सतत घडणाऱ्या या गुन्ह्यांनी ग्राहकांसह कंपन्याही त्रस्त झाल्या आहेत. बाफना मोटर्ससमवेतच काही महिन्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), महाराष्ट्र इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशनच्या ग्राहकांची अशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली. त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्याबरोबरच ‘गुगल’कडेही तक्रार केली आहे.

कंपन्यांच्या नावाने बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याच्या २० ते २५ घटना काही महिन्यांत घडल्या आहेत. या सदंर्भात गुगल कंपनीलाही कळविले आहे. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी. काही वेबसाइट, व्यक्ती किंवा मोबाईल क्रमांक संशयास्पद वाटल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 

बनावट वेबसाइटद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन त्याबाबतचा तपास करण्याचे सुरू आहे. नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून पैसे लाटणाऱ्या ११०० लाभार्थ्यांची बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber Crime loot of customers from cyber criminals