#CyberCrime एटीएम सांभाळा

ब्रिजमोहन पाटील
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

चोरट्यांनी पाकीट मारल्यानंतर त्यात पैशांसोबत एटीएम, क्रेडिट कार्डही चोरीला जाते. या कार्डचा वापर पुढे इतर गुन्ह्यांमध्ये होतो, अशी धक्‍कादायक बाब पोलिसांच्या चौकशीत उघड झाली.

पुणे - चोरट्यांनी पाकीट मारल्यानंतर त्यात पैशांसोबत एटीएम, क्रेडिट कार्डही चोरीला जाते. या कार्डचा वापर पुढे इतर गुन्ह्यांमध्ये होतो, अशी धक्‍कादायक बाब पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. अशा गुन्ह्यांची नोंद पुण्यात नाही. परंतु, कॉसमॉस बॅंकेच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी मुंबई व इतर भागातून अटक आरोपींकडून ही माहिती उघड केली.

बस, रेल्वे यासह गर्दीच्या ठिकाणी पाकिटमारी, पर्स चोरीला जातात. त्यातील रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, एटीएम कार्डही चोरीला जाते. कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी ते ब्लॉक करून विषय संपला, असे समजले जाते. मात्र, ऑनलाइन चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांसाठी हे कार्ड खूप महत्त्वाचे ठरते, असे स्पष्ट झाले.

सर्व्हर हॅक करून बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय माहिती चोरली जात आहे. हे कॉसमॉस बॅंकेच्या प्रकरणावरून समोर आले. कॉसमॉसच्या प्रकरणात बनावट एटीएम कार्ड वापरून ९४ कोटी रुपये मुंबई, इंदूर, अजमेर, जयपूर, कोल्हापूरसह इतर ठिकाणांवरून काढले गेले आहेत. पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली. चौकशी केल्यानंतर एटीएम कार्ड हे पाकीटमारीतून जमवले असल्याचे समोर आले आहे. 

कार्ड तयार करणाऱ्या खास संस्था एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डमध्ये गोपनीय माहिती असल्याने हे कार्ड व माहिती लीक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मोजक्‍याच संस्थांना काम दिले आहे. त्यामुळे हे कार्ड बाहेर कुठेही मिळत नाहीत. हे ऑनलाइन चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी पाकीटमारांशी संधान साधून कार्ड मिळवत आहेत. 

एटीएम केंद्र, हॉटेल यासह इतर ठिकाणी स्कीमर लावून कार्डमधील गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे गुन्हे केले जातात. पण, कॉसमॉस बॅंकेच्या प्रकरणाच्या तपासात पाकीट मारल्यानंतर त्यातील कार्डवर नवीन माहिती क्‍लोन करून ते कार्ड वापरल्याचे समोर आले. मुंबई व इतर शहरांमध्ये अशा टोळ्या आहेत. अद्याप पुण्यात असा प्रकार समोर आलेला नाही.
- जयराम पायगुडे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
 

असा होतो वापर
चोरलेल्या एटीएम कार्डावरील मॅग्नेटिक चिप काढली की हे कार्ड काही कामाचे राहत नाही. त्यानंतर त्यावर ऑनलाइन चोरलेल्या माहितीवरून तयार केलेली मॅग्नेटिक चिप लावली जाते. त्याचा वापर करून पैसे काढले जात आहेत. मोठ्या शहरांमध्ये पाकीट, पर्सचोरीचे गुन्हे घडतात. ऑनलाइन चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी पाकीटमारांशी संधान साधून त्यांच्याकडून फक्त हे कार्ड घेऊन ते गुन्हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber Crime Manage ATM