प्रलोभनांना बळी पडू नका ः पोलिस निरीक्षक ढिकले

प्रलोभनांना बळी पडू नका ः पोलिस निरीक्षक ढिकले
Published on: 

जिल्ह्यात वर्षांत ५ हजार सायबर गुन्हे; ३६० कोटींची फसवणूक ः ढिकले
अहिल्यानगर, ता. ११ : आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियावरील प्रलोभने, बनावट जाहिराती आणि अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमुळे नागरिकांची फसवणूक होत आहे. जिल्ह्यात वर्षांत ५ हजार सायबर गुन्हे व ३६० कोटींची फसवणूक झाली आहे, असे प्रतिपादन सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते ॲड. युवराज शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण रोड परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलिस निरीक्षक ढिकले बोलत होते. लालचंद्र हराळ अध्यक्षस्थानी होते. प्रा. भगवान काटे, विलास साठे, राजेंद्र शिंदे, आनंद शितोळे, महानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव भाऊसाहेब थोटे, माजी प्राचार्य उत्तमराव राजळे, अभय ललवाणी आदी उपस्थित होते.
ढिकले म्हणाले की, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी करतात. याच काळात सोशल मीडियावर आकर्षक ऑफर, बनावट जाहिराती आणि प्रलोभने दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेचा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती तसेच ओटीपी देऊ नये. अशा व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाउनलोड करू नये. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल करावी, अशी माहिती त्यांनी दिली. पारुनाथ ढोकळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भगवान काटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com