Cyber Fraud : ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल कैदेत’ ठेवून अडीच कोटींना लुटले !

‘तुमच्या बँक खात्याचा वापर एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाला आहे. तुमच्या मुलाचंही नाव त्यात आहे. तुमच्यावर अटक वॉरंट निघू शकते...’
Cyber Fraud
Cyber Fraudsakal
Updated on: 

पुणे - डेक्कन परिसरातील शांत घर. एका ६० वर्षीय महिलेचा मोबाईल वाजतो. स्क्रीनवर अनोळखी नंबर...व्हॉट्सॲपवरून आलेला व्हिडिओ कॉल. दुसऱ्या बाजूला पोलिसांचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्ती गंभीर आवाजात बोलतो, ‘मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यातून बोलतोय.

‘तुमच्या बँक खात्याचा वापर एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाला आहे. तुमच्या मुलाचंही नाव त्यात आहे. तुमच्यावर अटक वॉरंट निघू शकते...’ सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेस महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल दोन कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.

शहरात सायबर फसवणुकीच्या घटना दररोज घडत आहेत. पैशांच्या लालसेपोटी नागरिकही त्याला बळी पडत आहेत. कधी तीन लाखांची फसवणूक तर कोणाची ३० लाखांची, त्याला मर्यादा राहिलेली नाही. त्यात सायबर चोरटे ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांची संपूर्ण माहिती काढून लाखो रुपयांना गंडा घालत आहेत.

‘डिजिटल अरेस्ट’चा कट...

त्या अनोळखी व्यक्तीने महिलेला नरेश गोयल या एका मोठ्या गुन्हेगाराचे छायाचित्र दाखवले. तो म्हणाला, ‘तुमच्या खात्यातून या व्यक्तीच्या खात्यावर पैशांची देवाणघेवाण झाली आहे. तुमच्या बॅंक खात्याची पडताळणी करावी लागेल. जर तुम्ही कुणालाही याबद्दल सांगितलं, तर तुम्हाला अटक होईल.

आता तुम्ही ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये आहात!’ त्यामुळे ही महिला गोंधळून गेली. हृदयाची धडधड वाढली. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मानसिक छळाच्या खेळात तिला दररोज नवनवे आदेश दिले जाऊ लागले. महिनाभर ती या चोरट्यांच्या तावडीत होती.

दोन कोटी ५७ लाख रुपये गायब!

या कालावधीत महिलेने २ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये चोरट्यांच्या दिलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. रोज नवी भीती, नवा दबाव आणि मानसिक छळ. त्यानंतर १२ मार्च रोजी ज्येष्ठ महिलेचा अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी संवाद झाला.

त्याला सर्व प्रकार कळताच, त्याने तिला सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त डॉ. विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.

महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक तपासात हा गोरखधंदा केरळ, चेन्नई आणि इतर भागांतील टोळीने चालवला असल्याचा संशय आहे. चोरट्यांची काही बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

- स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

सावध राहा, सुरक्षित राहा!

- अनोळखी व्हॉट्सॲप कॉल्सना उत्तर देऊ नका.

- कोणत्याही पोलिस किंवा बँक अधिकाऱ्याने पैशांसाठी कॉल करत असल्यास, लगेच सत्यता पडताळा.

- कधीही अनोळखी खात्यात पैसे ट्रान्सफर करू नका.

- एका बनावट फोन कॉलमुळे कोट्यवधींचा फटका बसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com