पुणे - ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत खंडणी उकळून तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सायबर चोरट्यांना खराडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे..आकाशकुमार संजय सिंग (वय-१८ वर्षे दोन महिने, रा. गौरी, ता. कुंठपूर, जि. गोपाळगंज, बिहार) आणि राजकुमार संपूर्ण आनंद सिंग (वय-२२, रा. बिरण गड, ता. बाराहाट, जि. बांका, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सात मोबाईल, लॅपटॉप, टॅब असा सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका २२ वर्षीय तरुणाने एक ऑक्टोबर रोजी सकाळी रिव्हरडेल सूट सोसायटीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत तरुण शिखर सक्सेना याच्या वडिलांनी १४ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती. आरोपींनी शिखरला ‘अजयकुमार भाटिया’ या नावाने फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याबाबत धमकावले होते. त्यावरून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता..वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण आणि सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान, आरोपींनी सोशल मीडियावरील मुलींच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाती तयार केली होती. त्यावरून मृत शिखर सक्सेना याच्याशी संपर्क साधून त्याला टेलिग्रामवर येण्यास प्रवृत्त केले. तेथे व्हिडिओ कॉलदरम्यान मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्या कॉलचे रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची आणि ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पाच बँक खात्यांवर एक लाख ७७ हजार रुपयांची खंडणी उकळली. या त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले..या गुन्ह्यातील आर्थिक व्यवहारांची ‘मनी ट्रेल’ तपासून खराडी पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने पाच बँक खात्यांपैकी एक लाख १४ हजार रुपयांची रक्कम गोठवली. या गुन्ह्यातील मुख्य साथीदार अनिकेत गुप्ता (रा. लुधियाना, पंजाब) तसेच खंडणीची रक्कम स्वीकारणारा बँक खातेधारक क्रिश कुमार (रा. अरुणाचल प्रदेश) यांचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, गौहर हसन, सहाय्यक आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे, गणेश घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली..सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा -सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या व्हिडिओ कॉल्स, अश्लील क्लिप्स किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्यांना नागरिकांनी घाबरून पैसे देऊ नयेत. अशा प्रकारचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ‘१९३०’ या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.