फेक इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे छेडछाड करणाऱ्याचा शोध

फेक इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे 
छेडछाड करणाऱ्याचा शोध
Published on

माळेगाव, ता. १५ : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फेक इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून वारंवार अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या व्यक्तीचा माळेगाव पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मंगळवारी (ता. १५) शोध घेतला. हा प्रकार विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनीने अश्लील संदेश पाठविणारे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा नवीन फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात करण्यात आली. याबाबत विद्यार्थिनीने शक्ती अभियानांतर्गत २१ ऑगस्टला माळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची तातडीने दखल घेत माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर पथकाने सोशल मीडिया अकाउंट्स, उपलब्ध डिजिटल माहिती आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला. कौशल्यपूर्ण तपासातून संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. संबंधित बालकास ताब्यात घेऊन गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तसेच आवश्यकतेनुसार बालकाचे समुपदेशन करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. 

सोशल मीडियाच्या गैरवापराविरुद्ध कठोर कारवाई
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून मुली व महिलांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध माळेगाव पोलिसांकडून तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुली व महिलांनी सोशल मीडियावर अशा प्रकारचा त्रास होत असल्यास घाबरून न जाता तातडीने पालक, शिक्षक किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. अश्लील संदेश, फेक अकाउंट, धमकी अथवा ऑनलाइन छळाच्या घटना घडल्यास त्यांचे स्क्रीनशॉट, अकाउंटची लिंक, यूजरनेम तसेच अन्य डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत, असे आवाहनही अधिकारी संकपाळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com